Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:47 IST2025-07-22T13:46:46+5:302025-07-22T13:47:06+5:30
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

Satara: प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजुरीसाठी पाच हजारांची लाच, विस्तार अधिकारी अटकेत
वडूज (जि. सातारा) : खटाव-वडूज पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले. प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. शरण देवीसिंग पावरा (वय ४३, मूळ रा. आंबापूर, ता. शहादा, जि. नंदुरबार, सध्या दहिवडी) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे.
खटाव पंचायत समिती वडूज येथे विस्तार अधिकारी वर्ग ३ म्हणून कार्यरत असलेला शरण पावरा येथे वास्तव्यास आहे. लाचलुचपत विभागाकडे तक्रार केलेला तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२४-२०२५ साठी घरकुल मंजूर झाले होते.
या घरकुलाचा हप्ता शरण पावरा याने ७० हजार रुपये मंजूर करून दिले. त्यानंतरचे हप्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्याचे ठरले होते.
त्याप्रमाणे पंचायत समिती आवारात विस्तार अधिकारी पावरा यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.