Satara: पन्नास हजारांची लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:34 AM2024-03-27T11:34:17+5:302024-03-27T11:34:57+5:30

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता जितेंद्र राजाराम खलिपे (वय ५१, सध्या रा. पेडगाव रोड, वडूज, ...

Engineer of construction department caught in bribery net while accepting bribe of Rs.50,000 in Satara | Satara: पन्नास हजारांची लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Satara: पन्नास हजारांची लाच घेताना बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

वडूज : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता जितेंद्र राजाराम खलिपे (वय ५१, सध्या रा. पेडगाव रोड, वडूज, ता. खटाव, मूळ रा. उभी पेठ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) याला पन्नास हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांनी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्मिती शेडचे, अशी एकूण चार कामे केली होती. ही कामे पूर्ण केल्याचा दाखला देण्यासाठी वडूजमधील उपविभागीय अभियंता जितेंद्र खलिपे याने तक्रारदार यांच्याकडे एकूण ३४ लाख रुपये बिलाच्या दोन टक्क्यांप्रमाणे ६८ हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. 

त्यानंतर तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता खलिपे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी वडूज येथे सापळा लावण्यात आला. यावेळी खलिपे याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. वडूज पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर सावंत, हवालदार गणेश ताटे, पोलिस नाईक नीलेश चव्हाण, हवालदार नितीन गोगावले, महिला पोलिस नाईक प्रियांका जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे, पोलिस नाईक मारुती अडागळे आदींनी ही कारवाई केली.

अनेक अधिकारी लाचलुचपतच्या रडारवर..!

काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये दोन लिपिक जाळ्यात अडकले होते. तर आर्थिक ताळेबंद वर्षाअखेरीस जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मोठा अधिकारी गळाला लागल्याने तालुक्यातील कंत्राटदारांकडून अनेक अधिकारी पैशांसाठी वेठीस धरतात. त्याचीच चर्चा दिवसभर वडूजमध्ये सुरू होती. त्यामुळे अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Engineer of construction department caught in bribery net while accepting bribe of Rs.50,000 in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.