Satara: फलटणच्या यशवंत बँकेवर ईडीचा छापा; मुख्य कार्यालयासह, कराड शाखेतही कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:37 IST2025-12-24T12:37:11+5:302025-12-24T12:37:38+5:30

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी चौकशी

Enforcement Directorate team takes action in case of embezzlement of Rs 112 crore from Yashwant Bank in Phaltan | Satara: फलटणच्या यशवंत बँकेवर ईडीचा छापा; मुख्य कार्यालयासह, कराड शाखेतही कारवाई

Satara: फलटणच्या यशवंत बँकेवर ईडीचा छापा; मुख्य कार्यालयासह, कराड शाखेतही कारवाई

फलटण/जिंती : फलटण येथील यशवंत बँकेतील ११२ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या पथकाने कारवाई केली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील यशवंत को-ऑप बँकेच्या मुख्य कार्यालयात तसेच कराड येथील कार्यालयात छापा टाकून तपासणी सुरू केली. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

ईडी अधिकाऱ्यांनी प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडी पथकाने थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मोर्चा वळवला. सकाळी बँकेचे कार्यालय सुरू होताच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची तपासणी केली. यामुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी ठप्प होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच

यशवंत बँकेच्या कराड येथील शाखेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तळ ठोकला असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही.

चरेगावकर यांच्या निवासस्थानी चौकशी

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले असता ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्यासह दोघांकडून ईडीचे पथक माहिती घेत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा शेखर चरेगावकर बाहेरगावाहून परत येत असल्याची चर्चा आहे.

अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळले

दरम्यान, यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेल्या संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर मंगळवारी कराड येथील न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आठ संचालकांचे अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळले. यामध्ये विठ्ठल गोविंद कुलकर्णी, राही विठ्ठल कुलकर्णी, वैभव विलास कुलकर्णी, संहिता काशिनाथ कुलकर्णी, काशिनाथ रामचंद्र कुलकर्णी, सूरज सत्यजित गायधनी, बिभीषण महादेव सोनवणे, दिनेश भानुदास ढवळे अशी जामीन अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच यशवंत बँकेच्या चेअरमनसह तब्बल ५० जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यापैकी ३० हून अधिक जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

याप्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा कथित अपहार केल्याचा आरोप आहे.

बोगस कर्जप्रकरणे, बनावट कागदपत्रांचा वापर

फिर्यादीत बोगस कर्ज प्रकरणे उ करण्यात आली. खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. तारण न घेता कर्ज वाटप करण्यात आले, जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडण्यात आली. निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवला. दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करण्यात आला, असे गंभीर आरोप केले आहेत.

यशवंत बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी भाजपच्या नेत्या, खासदार मेघा कुलकर्णी यांना घेऊन आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तशी मागणी केली होती. ईडी कार्यालयातही ठेवीदारांच्या वतीने पत्रव्यवहार केला होता. या सगळ्याची दखल घेत ईडीने यशवंत बँकेत सुरू केलेली चौकशी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व ठेवीदारांना न्याय मिळेल व दोषींवर कारवाई होईल, अशी आम्हाला खात्री आहे.- ॲड. नीलेश जाधव, कराड

Web Title: Enforcement Directorate team takes action in case of embezzlement of Rs 112 crore from Yashwant Bank in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.