Satara: महामार्गाकडेच्या अतिक्रमणातील राहत्या घरावर चालविला जेसीबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:18 IST2025-12-24T15:18:04+5:302025-12-24T15:18:21+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा ते चौपाळा याठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने ...

Satara: महामार्गाकडेच्या अतिक्रमणातील राहत्या घरावर चालविला जेसीबी
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा ते चौपाळा याठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने अतिक्रमणावर हातोडा मारत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून कडक धोरण अवलंबण्यात आल्याने अनेकांचे संसार मातीमोल झाले.
शिरवळ येथील आशियाई महामार्ग ४७ च्या रस्ता रुंदीकरणाच्या व प्रस्तावित उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात पुणे ते सातारा बाजूकडे असणाऱ्या पंढरपूर फाटा ते चौपाळा येथील महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या रेषेत येणारे पक्के तसेच कच्चे बांधकाम तसेच टपऱ्या यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत धडक मोहीम राबविली.
यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अतिक्रमणावर हातोड्याची सुरुवात करण्यात आल्यानंतर अनेक टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी अतिक्रमण मोहिमेप्रसंगी शिरवळ पोलिस ठाण्याकडून मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.
अतिक्रमण मोहीम राबविताना फलटण पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, शिरवळचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी राम लथाड, वरिष्ठ अभियंता सुभाष घंटे, निमतानदार लक्ष्मण पाटील, बद्रीप्रसाद शर्मा, अभिजीत गायकवाड, इंजिनिअर सचिन जैन, अखिल बेसके, एल. एन. मालवीय, आर. नारायणस्वामी, शिरवळ पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी शिरवळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोहीम सुरूच राहणार
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून संपादन केलेल्या महामार्गापासून निर्धारित केलेल्या नियंत्रण रेषेमध्ये येणाऱ्या अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.