Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त

By प्रमोद सुकरे | Updated: March 6, 2026 19:37 IST2026-03-06T19:36:01+5:302026-03-06T19:37:15+5:30

राष्ट्रवादीचे सदस्य २० दिवसांपासून टुरवर, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Elections of Satara Zilla Parishad and Panchayat Samiti office bearers delayed | Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त

Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त

प्रमोद सुकरे

कराड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल लागून महिना होत आला तरी अजून पदाधिकाऱ्यांच्या निवडीला मुहूर्त लागताना दिसत नाही. ग्रामविकास विभागाने २० मार्चपूर्वी निवडी घेण्याबाबत परिपत्रक काढून १० दिवस लोटले; पण प्रशासनाचे हातावर हात आहेत. त्यामुळे या निवडी मुद्दाम रखडवल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘भाजप धूर्त म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त’ असेही बोलले जात आहे.

मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा परिषदची निवडणूक गत महिन्यात झाली. दि. ९ फेब्रुवारी रोजी त्याचा निकालही जाहीर झाला. आता या निकालाला महिना होत आला आहे. तर २५ फेब्रुवारी रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० मार्चपूर्वी पदाधिकारी निवडी घेण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र, अजूनही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे या निवडी रखडण्यामागे नेमकं कोण आहे? त्यामागे नेमकं काय दडलंय? याच्याही खुमासदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहेत बरं.

खरं तर नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर मिळवलेल्या यशामुळे भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतही स्वबळाचा नारा दिला. जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकविण्याचा निर्धार त्यांनी केला. पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना पुरेसे संख्याबळ मिळवता आलेले नाही. त्यांची गाडी २७ वरच अडली. याउलट राष्ट्रवादी व शिंदेसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली आणि सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगरही गाठली. त्यामुळे भाजपची अस्वस्थता लपून राहिलेली नाही.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुरेसे संख्याबळ नसतानाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अन् मित्रपक्षाच्या धास्तीने राष्ट्रवादी व शिंदेसेनेने आपापले जिल्हा परिषद सदस्य टुरवर पाठवले आहेत. त्यामुळे या निवडीबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

अतुल भोसलेही म्हणतात...

खरं तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचाच जिल्हा परिषदेत अध्यक्ष होईल असे म्हणून सुरुवातीलाच खळबळ उडवून दिली. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसलेदेखील सावध पण तोच सूर आळवत आहेत. आम्ही महायुती म्हणून राज्यात चांगले काम करत आहोत. भविष्यातही चांगले काम करायचे आहे. त्यामुळे साताऱ्यातही महायुतीची सत्ता यावी, एकत्र काम करावे, अशी सगळ्यांची धारणा आहे. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील. त्याची अंमलबजावणी आम्ही करू, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे सदस्य २० दिवसांपासून टुरवर

राष्ट्रवादीचे सदस्य गेल्या १६ दिवसांपासून टुरवर आहेत. गोवा, कर्नाटकमधील बऱ्याच पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत म्हणे. तर शिवजयंती साजरी केल्यानंतर शिंदेसेनेचे सदस्यही टुरवर गेले आहेत. त्यालाही आता १३ दिवस झालेत.

..म्हणून वेळ घालविला जात आहे

भाजपला साम-दाम-दंड-भेद या पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत त्यांचे प्रयत्न सुरू असून, ते अजूनही थांबलेले नाहीत. आज ना उद्या त्याला यश येईल असे त्यांना वाटत आहे; म्हणूनच या निवडीला जास्तीतजास्त उशीर करण्याचा खेळ तेच करत असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.

Web Title : सतारा ZP चुनाव में देरी: बीजेपी की चालें संदिग्ध, सत्ता संघर्ष तेज।

Web Summary : सतारा ZP चुनाव में देरी से राजनीतिक अटकलें तेज हो गई हैं। बीजेपी की सत्ता हासिल करने की कथित चालें संदिग्ध हैं। एनसीपी और शिंदे सेना के सदस्य दौरे पर हैं, जिससे अनिश्चितता और बढ़ गई है। सबकी निगाहें अंतिम फैसले पर टिकी हैं।

Web Title : Satara ZP Elections Delayed: BJP's Tactics Suspected, Power Struggle Intensifies.

Web Summary : Satara ZP elections are delayed, sparking political speculation. BJP's alleged tactics to gain power are suspected. NCP and Shinde Sena members are on tour, further fueling the uncertainty. All eyes are on the final decision.