Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:33 IST2025-12-01T19:33:09+5:302025-12-01T19:33:47+5:30
आर्थिक गणिते कोलमडली !, अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया जैसे थे

Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार
सातारा : सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान होणार असले तरी, निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणास्तव फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. या दोन्ही पालिकांसाठी शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार या दोन्ही पालिकांच्या अर्ज माघारीपर्यंतच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार आहे. केवळ नामनिर्देशनपत्राबाबत हरकती दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांवर सुनावणी होऊन त्यांचे अर्ज वैध, अवैध ठरवून चिन्ह वाटप व पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाईल. त्यामुळे नव्या कोणत्याही उमेदवारांना निवडणुकीची संधी मिळणार नाही.
आर्थिक गणिते कोलमडली !
दोन पालिकांची निवडणुकीची लांबलेली प्रक्रिया उमेदवारांसाठी दुहेरी आव्हान घेऊन आली आहे. एकीकडे प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला असला तरी दुसरीकडे निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना खर्चाची जी मर्यादा घालून दिली आहे, ती पाळणे आता अधिक कठीण होणार आहे. अनेक उमेदवारांनी दि. २ डिसेंबरच्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती; आता वाढीव प्रचारासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक गणिते कोलमडणार आहेत.
प्रचार आणि वेळेचे व्यवस्थापन..
निवडणूक लांबणीवर गेल्याने उमेदवारांना त्यांच्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि प्रचार धोरणे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र, हा वाढीव वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा आणि आयोगाच्या खर्चमर्यादेत राहून प्रचार कसा करायचा, हे मोठे आव्हान उमेदवारांसमोर उभे आहे.
अनेक नागरिकांमध्ये संभ्रम..
राज्य निवडणूक आयोगाने महाबळेश्वर व फलटण पालिकेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र संभ्रम निर्माण झाला. निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविली जाणार असून, नव्या उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने पेव फुटले. मात्र, असे काहीही होणार नाही. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापर्यंतचा कार्यक्रम ‘जैसे थे’ राहणार आहे. ज्या उमेदवारांची चिन्हे मिळाली आहेत, तीदेखील कायम राहणार आहेत. केवळ उमेदवारी अर्जाबाबत ज्यांनी अपील केले आहे, त्यांच्या अपिलांवर निर्णय होऊन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
निवडणूक पुढे का ढकलण्यात आली..
- फलटण आणि महाबळेश्वर या दोन्ही पालिकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या अपिलांची सुनावणी आणि त्यांचा अंतिम निर्णय देण्याचे काम निवडणुकीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अपिलांवरील निर्णय दिल्याशिवाय निवडणुकीची पुढील प्रक्रिया पुढे नेता येत नाही, कारण अपिलांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक रिंगणातील अंतिम आणि वैध उमेदवारांची यादी निश्चित करता येत नाही.
- जर एखाद्या उमेदवाराचे अपील मंजूर झाले, तर त्याला निवडणूक लढवण्याचा हक्क मिळतो आणि जर ते फेटाळले, तर त्याची उमेदवारी रद्द होते.
- अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झाल्याशिवाय त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करता येत नाही आणि मतदारपत्रिकेवर त्यांची नावे समाविष्ट करता येत नाहीत. ही प्रक्रिया मतदानापूर्वी पूर्ण होणे बंधनकारक आहे. वेळेत सुनावणी न घेता निवडणूक घेणे हे उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाच्या आणि कायदेशीर निवडणूक लढवण्याच्या हक्काचे उल्लंघन ठरले असते.
- या तांत्रिक अडचणीमुळे, निवडणूक आयोगाने दि. २ डिसेंबर रोजी होणारे मतदान तात्पुरते स्थगित केले आणि सर्वप्रथम अपिलांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही पालिकांसाठी दि. २० डिसेंबरला मतदान, तर दि. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.