Satara: चोरे येथे वृद्धेचा डोक्यात शस्त्राने वार करून खून, कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:18 IST2024-05-28T12:17:59+5:302024-05-28T12:18:44+5:30

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Elderly woman killed by stabbing in head at Chore Satara, reason unclear  | Satara: चोरे येथे वृद्धेचा डोक्यात शस्त्राने वार करून खून, कारण अस्पष्ट 

Satara: चोरे येथे वृद्धेचा डोक्यात शस्त्राने वार करून खून, कारण अस्पष्ट 

उंब्रज : चोरे (ता. कऱ्हाड) येथील ताराबाई आनंदराव यादव (वय ६४) यांचा डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना सोमवार, दि. २७ रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. हा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नसून उंब्रज पोलिसांची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

ताराबाई यादव यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असल्यामुळे त्या त्यांच्या घरात एकट्याच राहत होत्या. सोमवार, दि. २७ मे रोजी सकाळी ताराबाई यादव या नेहमीप्रमाणे घरातून बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा पुतण्या अशोक यादव हे त्यांच्या घरी गेले. त्यांना पुढील दरवाजा बंद दिसून आला. पाठीमागील दरवाजाकडे ते गेले असता दरवाजा उघडा दिसला. ते व ग्रामस्थ घरात गेले तेव्हा ताराबाई यादव या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसून आले. त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राचे घाव घालून त्यांचा कोणीतरी खून केल्याचे समोर आले. 

या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. अज्ञातांनी ताराबाई यांचा रात्रीच्या सुमारास खून केला असल्याचे पोलिसांचा कयास आहे.

प्रदीप आनंदराव यादव (वय ४०, रा. चोरे, ता. कऱ्हाड, सध्या रा. गोकुळ शिरगाव) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Elderly woman killed by stabbing in head at Chore Satara, reason unclear