Satara Crime: ग्लासमध्ये दारू कमी भरली म्हणून वृद्धाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:09 IST2025-07-05T19:08:39+5:302025-07-05T19:09:12+5:30
सातारा : चाहूर, सातारा येथे राष्ट्रीय महामार्गालगत भंगार दुकानात रात्री ग्लासमध्ये दारू भरल्याच्या कारणावरून शुक्रवारी पहाटे दोन कामगारांमध्ये तुंबळ ...

Satara Crime: ग्लासमध्ये दारू कमी भरली म्हणून वृद्धाचा खून
सातारा : चाहूर, सातारा येथे राष्ट्रीय महामार्गालगत भंगार दुकानात रात्री ग्लासमध्ये दारू भरल्याच्या कारणावरून शुक्रवारी पहाटे दोन कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात सिमेंटची वीट मारल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा कामगार जखमी झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल झाला आहे.
जगन्नाथ दगडू पवार (वय ६०, रा. केसरकर पेठ) असे मृत कामगाराचे नाव आहे तर दुसरा कामगार तुकाराम जगन्नाथ पवार (रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) हा जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुकान मालक प्रशांत नानाजी कांबळे (रा. शाहुपूरी) यांच्या फिर्यादीनुसार तुकाराम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन्नाथ पवार सहा वर्षापासून महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानात कामाला होता. दि. २ जुलैला तुकाराम दुकानात काम मागण्यासाठी आला होता. त्यालाही कांबळे यांनी कामावर ठेवले होते. ते दोघे दुकानावरील शेडमध्येच रात्री राहत होते. गुरुवारी रात्री दारू कमी दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये मारामारी झाली. त्यावेळी तुकाराम याने दगडू याला चुलीच्या सिमेंटच्या विटेने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
पहाटे साडेतीनच्या तुकाराम शेजारी असलेल्या दुकानात गेला. तेथील कामगाराला उठवून मालकाला फोन करायला लावला. फोनवरून त्याने प्रशांत कांबळे यांना मारामारीची माहिती दिली. त्यानंतर प्रशांत वडिलांसह दुकानावर गेला. तेव्हा तेथे जगन्नाथ पवार रक्ताच्या थारोळ्यात दिसले. तसेच तुकाराम हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली.
याबाबत त्यांनी डायल ११२ ला फोन करून शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी जगन्नाथ हा निपचीत पडलेला पोलिसांना दिसला. त्याच्या तोंडावर व डोक्याला गंभीर मारहाण होवून जागीच मृत्यू झालेला होता. घटनास्थळावरील पंचनामा व इतर प्रक्रीया झाल्यानंतर आज सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. जखमी तुकारामवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर प्रशांत यांनी तुकाराम विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.