Satara: महिला पोलिसाचे केस पाळण्यात अडकले, त्वचेसह केस उपटून निघाले; वडाचे म्हसवे यात्रेतील घटना

By दत्ता यादव | Updated: February 9, 2026 16:09 IST2026-02-09T16:08:44+5:302026-02-09T16:09:37+5:30

पुण्यात शस्त्रक्रिया; सहाजणांवर गुन्हा

During a yatra held in Vadache Mhasve village of Satara district a female police officer got her hair caught in a hairpin and her hair was pulled out along with her skin | Satara: महिला पोलिसाचे केस पाळण्यात अडकले, त्वचेसह केस उपटून निघाले; वडाचे म्हसवे यात्रेतील घटना

संग्रहित छाया

सातारा : जावळी तालुक्यातील वडाचे-म्हसवे गावात भरलेल्या यात्रेमध्ये आकाश पाळण्यांवर बसलेल्या महिलापोलिसाचा अत्यंत गंभीर अपघात घडल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. पाळण्यात बसले असताना लोखंडी रॉडमध्ये तिचे केस अडकल्याने केस त्वचेसह उपटून निघाले. जखमी महिलापोलिसावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या महिला पोलिसाचे नाव ऋतुजा शंकर सावंत (वय २२) असून ती मुंबई पोलिस दलात चालक म्हणून कार्यरत आहे. सध्या ती अंधेरी, मुंबई येथे वास्तव्यास असून मूळ रहिवासी म्हसवे, वडाचे, ता. जावळी येथील आहे. वडाचे–म्हसवे गावची यात्रा ३ व ४ फेब्रुवारी रोजी भरविण्यात आली होती.

ऋतुजा ही आकाश पाळण्यात बसली होती. पाळणा सुरू असतानाच तिचे लांब केस पाळण्यातील लोखंडी रॉडमध्ये अडकले. हा प्रकार पाळण्यात बसलेल्या इतर तरुण-तरुणींच्या लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड केली. मात्र, पाळणा वेगात सुरू असल्यामुळे आवाज बाहेर कोणालाच ऐकू गेला नाही. अखेर काही तरुणांनी पाळण्याच्या मोठ्या लोखंडी अँगलला धरून लोंबकळत पाळणा थांबवला.

तोपर्यंत ऋतुजाच्या डोक्यावरील केस त्वचेसह उपटून निघाले होते. पाळण्यात अडकलेले केस कात्रीने कापून तिला खाली उतरवण्यात आले. गंभीर अवस्थेत तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला पुणे येथे हलविण्यात आले. तेथे तिच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अजून दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. यासाठी सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार डोक्याच्या वरच्या भागातील केसांचे तीन लेअर असतात. त्यापैकी ऋतुजाचे दोन लेअर त्वचेसह निघाले असून, एक लेअर शिल्लक आहे. त्यामुळे मेंदूला थेट दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

यात्रा कमिटीच्या अध्यक्षासह पाळणा मालकावर गुन्हा

यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी पोलिस ठाण्याची कोणतीही परवानगी न घेता पाळणा सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आकाश पाळणा मालक संजय दत्तू चव्हाण (सध्या रा. कडेगाव, ता. वाई, मूळ रा. माळशिरस, सोलापूर), पाळणा फिरवणारा चालक तसेच यात्रा कमिटीतील विश्वास गुलाब शिर्के, सुनील जाधव व विठ्ठल शिर्के (रा. म्हसवे, वडाचे) यांच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निकम हे करत आहेत.

Web Title : सतारा: मेले में झूले पर महिला पुलिसकर्मी के बाल उखड़े, पुणे में इलाज जारी

Web Summary : सतारा में, एक महिला पुलिसकर्मी के बाल मेले में झूले में फंसने से गंभीर रूप से घायल हो गईं, जिससे उनकी खोपड़ी छिल गई। पुणे में उनका इलाज चल रहा है। पुलिस ने लापरवाही के लिए झूले के मालिक और मेला समिति के खिलाफ मामला दर्ज किया।

Web Title : Satara: Woman's Hair Scalped in Fairground Ride Accident, Pune Treatment On

Web Summary : In Satara, a woman police officer suffered severe injuries when her hair got caught in a fairground ride, tearing off her scalp. She is undergoing treatment in Pune. Police filed a case against the ride owner and fair committee for negligence.