Satara: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाइकाकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:22 IST2025-12-10T18:20:43+5:302025-12-10T18:22:09+5:30
तासभर कामबंद आंदोलन : रुग्णाशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप

Satara: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाइकाकडून मारहाण
फलटण : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अविनाश गायकवाड यांना मंगळवारी रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच डॉक्टरला मारहाण झाली. यामुळे रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ काही वेळ कामबंद आंदोलनही करण्यात आले.
याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात मंगळवारी सकाळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामात मग्न असतानाच गोंधळ सुरू झाला. सोमवारी तपासणी केलेल्या रुग्णाचा नातेवाईक सकाळी अकराच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात आला. त्याने डॉ.अविनाश गायकवाड यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारहाण केली.
सोमवारी तपासणी केलेल्या रुग्णास वापरलेली भाषा योग्य नसल्याच्या कारणावरून संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाने थेट डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा जाहीर निषेध करत, सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील काम बंद ठेवत निषेध केला. दरम्यान, या घटनेची व गुन्ह्याची फलटण शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती, अशी माहिती फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.
रुग्णसेवा देताना अडचणी...
फलटण उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी यावर त्वरित बंदोबस्त व प्रतिबंध करा अथवा हे रुग्णालयच दुसरीकडे हलवा अशी मागणी केली. रुग्णसेवा देत असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत असल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केला.
विधानसभेत प्रश्न अन् फलटणला मारहाण
फलटण येथील डॉक्टर आत्महत्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मंगळवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिले. त्याच वेळी फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टराला मारहाण करण्यात आली. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.