साताऱ्यात ‘महायुती’मध्ये धुसफूस; पालकमंत्र्यांना शिवेंद्रराजेंचे उत्तर; आधी ‘पाटण’ची घोषणा करा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:59 IST2025-11-10T12:56:44+5:302025-11-10T12:59:10+5:30
Local Body Election: मंत्री देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ’ असा इशारा दिला होता

साताऱ्यात ‘महायुती’मध्ये धुसफूस; पालकमंत्र्यांना शिवेंद्रराजेंचे उत्तर; आधी ‘पाटण’ची घोषणा करा !
सातारा : ‘सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीतील एका कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेवर थेट भाष्य केले. ‘पालकमंत्र्यांना आम्ही कधीच कमी लेखत नाही, पण जसा पाटणमध्ये निर्णय होईल, तसाच मेढ्यात होईल,’ असे सांगत त्यांनी मेढ्यातील निवडणुकीची भूमिका स्पष्ट केली.
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील सभेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ’ असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्र्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले.
ते म्हणाले, ‘मी आता मंत्री झालो आहे, शंभूराज देसाई माझ्या आधी मंत्री होते, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. आम्ही त्यांचेच अनुकरण करत आहोत. मंत्री म्हणून कसं काम करायचं हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत. ते पालकमंत्री आहेत आणि वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आम्ही आदरच करतो.
महायुती म्हणून त्यांनी सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय जाहीर करावा, तसाच निर्णय आम्ही देखील घेऊ. मेढ्यात आपली ताकद आहे. केवळ निवडणूक आली म्हणून काहीतरी सांगितलं आणि गेलो असं होत नाही. आपण प्रत्येक विषयासाठी, कामासाठी, प्रश्नासाठी कायमच एकत्र येतो. असे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांना सूचक सल्लाही दिला.
नव्या वादाची ठिणगी..
सातारा जिल्ह्यात महायुतीचे चार मंत्री आहेत. यात दोन भाजप, एक शिंदेसेना व एक राष्ट्रवादीचा आहे. शिंदेसेनेतील मंत्री शंभूराज देसाई यांनी मेढ्यातील राजकारणावरून आक्रमक भूमिका घेतली होती. यावर भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र मेढ्यातील कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका ठळकपणे मांडली. महायुतीतील दोन मंत्र्यांच्या या राजकीय जुगलबंदीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.