परिवर्तनाची प्रेरणा मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:04 IST2017-11-25T12:58:07+5:302017-11-25T13:04:06+5:30
‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

परिवर्तनाची प्रेरणा मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक - देवेंद्र फडणवीस
क-हाड - ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘एफआरपी लागू करून शेतक-यांना चांगला ऊसदर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहेच. शिवाय शुक्रवारीच १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी एवढी कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशातील उत्तुंग नेतृत्व आणि ज्यांनी ख-या अर्थाने महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले. तसेच महाराष्ट्रात राहणा-या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचं सरकार काम करीत आहे. आणि मला विश्वास आहे, ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पुरस्कार यशवंतरावांनी केला होता ते सुसंस्कृत राजकारण करीत सामान्यांना, शेतक-यांना तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. तिच प्रेरणा मी या ठिकाणाहून घेऊन जातोय.’ यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन यात्रेनंतर मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे रवाना झाले. तेथून त्यांनी विमानाने वाळव्याला प्रस्थान केले.
स्मृतिस्थळी राजकीय प्रश्न नकोत!
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस लोकांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठाकडे येत असताना वाटेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शेतकरी कर्जमाफीसारखे राजकीय प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी कोणतेही राजकीय प्रश्न नकोत,’ असे म्हणत या प्रश्नांना बगल दिली.
Paid tributes to the First Chief Minister of Maharashtra Shri Yashwantrao ji Chavan at Karad, on his SmrutiDin.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 25, 2017
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांना स्मृतिदिनी आज सकाळी कराड येथे पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/GR38BqUuHA