वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या देऊर ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी चार पॅनेलमधून २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी शेतकरी पॅनेलने आठ जागी, तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर यंदा पहिल्यांदा आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुधाई देवी परिवर्तन पॅनेलने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर वाॅर्ड क्र ४ मधून माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर कदम यांचा मुलगा विकास कदम अपक्ष म्हणून राजकीय आखाड्यात पहिल्यांदा उतरला आहे. याशिवाय याच वाॅर्डातून सागर कदम हा दुसरा अपक्ष नशीब आजमावत आहे. तसेच सर्व समाजातील युवकांनी निर्माण केलेल्या देऊर विकास आघाडीमधूनही आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असल्याने यंदा सत्तेच्या गणिताचा आकडा कोणा एकाला गाठता येईल का? हा प्रश्न आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी पॅनेल व श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने एकत्रितपणे जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढत श्री मुधाई मंदिरात २१ नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. यानंतर हनुमान मंदिरासमोर या दोन्ही पॅनेलची कोपरा सभा झाली. यावेळी दोन्ही पॅनेलच्या ११ उमेदवारांनी आपला परिचय करून दिला.
तर गुरुवारी सकाळी देऊर विकास आघाडीनेही जोरदार शक्तिप्रदर्शन करत श्री मुधाई मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुधाई देवी परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा रविवारी प्रारंभ होत आहे. यावेळी गेली पाच वर्षांतील सत्ताधारी पॅनेलच्या कारभाराची लक्तरे बाहेर काढली जाणार असल्याने पुढील पाच दिवसांत प्रचाराचा वेग वाढणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना खूश करण्यासाठी दारू आणि पैसा वाटप करण्याचाही उद्योग काही लोकांकडून होणार असल्याने अशा लोकांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहणे आवश्यक आहे. एकूणच अशा भूलथापांना देऊर गावातील जागरूक मतदार कोणत्याही प्रकारे भुलणार नसल्याने हे प्रयत्न निरर्थक जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट...
पहिल्याच दिवशी फलकयुद्ध!
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण गावात फलकयुद्ध सुरू झाले आहे. गावातील चौकाचौकांत तिन्ही पॅनेलचे फलक झळकू लागले आहेत. आता पुढील पाच ते सहा दिवसांत सर्वच उमेदवार मतदाराच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना आपलंसं करण्यावर भर देतील, तर सत्ताधारी विरोधात श्री मुधाई देवी पॅनेल व श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल सत्ता स्थापन्यासाठी आक्रमक होणार आहेत.