सातारा जिल्ह्यातील जुळ्या बहिणी केंद्रीय लोकसेवेतून बनल्या एकाच खात्यात अधिकारी, दीपाली कर्णे राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:09 IST2025-10-04T13:09:07+5:302025-10-04T13:09:16+5:30
दीपाली कर्णे हिने देशात २४ वा क्रमांक मिळविला

सातारा जिल्ह्यातील जुळ्या बहिणी केंद्रीय लोकसेवेतून बनल्या एकाच खात्यात अधिकारी, दीपाली कर्णे राज्यात प्रथम
पुसेगाव : खटाव तालुक्यातील डिस्कळच्या दीपाली दशरथ कर्णे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुठलाही कोचिंग क्लास न लावता आर्थिक अडचणींवर मात करत रूपाली हिच्या पाठोपाठ २०२५ मध्ये झालेल्या यूपीएससी भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मानही त्यांनी पटकावला, तर देशात २४ वी रँक प्राप्त केली.
खटाव तालुक्यातील डिस्कळ गावातील दशरथ कर्णे जुळ्या मुली अन् एका मुलासह राहत आहेत. २०२१ मध्ये रूपाली यांनी यूपीएससी भारतीय सांख्यिकी सेवेत (आयएसएस) राज्यात पहिली व देशात ५ क्रमांक प्राप्त केला होता. त्यांच्याबरोबर यूपीएससीच्या अभ्यासात दीपाली यांनी सातत्य ठेवले. त्यांनी अपयशाने खचून न जाता अभ्यासात कायम सातत्य ठेवले. २०२३ एमपीएससी सरळ सेवेतून पात्र होऊन सन २०२४ मध्ये धाराशिव येथे सांख्यिकी अन्वेषक या पदावर त्या काम करीत आहेत. त्यांनी स्व-अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आता त्या यूपीएससीतून आयएसएस अधिकारी झाल्या.
पदव्युत्तर शिक्षणानंतर दीपाली यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यावेळी त्यांच्याकडे मोबाइलही नव्हता आणि कोचिंग क्लाससाठी पैसेही नव्हते. यूपीएससीच्या तयारीदरम्यान त्या डिस्कळ येथे घरी राहून सेल्फ स्टडी करीत होत्या. त्यांचा भाऊ प्रा. योगेश कर्णे व आयएसएस अधिकारी रूपाली यांचे मार्गदर्शन दीपाली यांना लाभत होते.
जुळ्या बहिणी झाल्या आयएसएस
तुमचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं, तुम्ही इंग्रजी बोलता का नाही किंवा तुम्ही क्लासेस लावले का नाही हे महत्त्वाचं नाही. स्वतःवरचा विश्वास आणि सतत मेहनत यावर यश अवलंबून असते. रूपाली व दीपाली या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांनी कोणतेही क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टडी करून रूपाली २०२१ मध्ये व दीपाली २०२५ मध्ये यूपीएससी परीक्षेतून आयएसएस अधिकारी झाल्या आहेत.