विदेशी कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने कोटीची फसवणूक; साताऱ्यातील १९ जणांकडून तक्रार, ३९ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:30 IST2025-09-12T18:29:57+5:302025-09-12T18:30:17+5:30
सातारा : अमेरिकन कंपनी असल्याचे सांगून त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला सरासरी ५ ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष ...

विदेशी कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने कोटीची फसवणूक; साताऱ्यातील १९ जणांकडून तक्रार, ३९ जणांवर गुन्हा दाखल
सातारा : अमेरिकन कंपनी असल्याचे सांगून त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला सरासरी ५ ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३१ लाख ४९ हजार ९२३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी साताऱ्यातील १९ तक्रारदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ३९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जोसेफ अँटनी मार्टिनेझ, मॅन्टिगो परेरा, उमेश चाैशी, रणवीर भानूप्रताप सिंग, प्रियंका खन्ना, नैना भाटी, प्रेमकुमार शर्मा, मंगेश शिंदे, उमंग गोपी, हर्ष, प्रिन्स्टन परेरा, तजीश दुबे, राज गाैड, राज मंगोरे, नीलेश डावखरे, तुषार पोनुगडे, विक्रांत कदम यांच्यासह ३९ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. हे सर्व संशयित आरोपी सातारा, पुणे, मुंबईतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकन कंपनीचे मुंबई येथे ऑफिस आहे व त्यांच्या कंपनीखाली टीपी ग्लोबल एफ एक्स हा फोरेक्स ट्रेडिंग ब्रोकर असून, या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास सरासरी ५ ते १५ टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखविण्यात आले. वेळोवेळी तक्रारदार यांना ४२ लाख १३ हजार ८८९ रुपये गुंतविण्यास सांगून त्यामधून ७ लाख २५ हजार ८७८ रुपये फायदा त्यांना दिला व त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. तक्रारदार यांची ३४ लाख ८८ हजार, तर त्यांच्यासह इतर १९ जणांची मिळून १ कोटी ३१ लाख ४९ हजार ९२३ रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार साताऱ्यातील मंगळवार पेठेत घडला आहे.