कऱ्हाड : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील घोडके मळा परिसरात कृष्णा नदीमध्ये ग्रामस्थांना मगर आढळून आली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्या ठिकाणी मगर दिसल्याने कामगारांनीही पाण्यातील काम बंद ठेवले आहे.कृष्णा नदीपात्रात गत काही दिवसांपासून ठिकठिकाणी मगरीचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. नदीकडेला मगरीचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नदीमध्ये पोहायला जाणाऱ्या लहान मुले व लोकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. महिलांनीही नदीकाठी जाणे बंद केले आहे.रेठरे येथील कृष्णा नदी पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून अनेक वेळा दुरुस्तीच्या कामासाठी पाणबुडी कामगारांना पाण्यामध्ये उतरावे लागत आहे. तसेच ते कामगार एक ते दोन तास पाण्यामध्ये राहून काम करत असतात. त्यांच्यासाठी आता काम करणे अवघड झाले आहे. मगर दिसल्याने कामगार पाण्यामध्ये उतरायला घाबरत आहेत.त्याशिवाय घोडके मळी येथे प्रकाश घोडके, श्रद्धा घोडके, यशवंत बिरमोळे, अण्णा हिवरे हे नदीकडेला काम करत असताना त्यांना मगर दिसल्यामुळे ते घाबरले. त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीज पंप सुरू करण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदीपात्रात जाणे धोक्याचे बनले आहे. वन विभागाने मगरीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन, कामगारांनी भितीने पूल दुरुस्तीचे काम ठेवलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:49 IST