महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा, अन्यथा..; मंत्री शंभूराज देसाईंचा महामार्ग प्राधिकरणला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:50 IST2025-08-26T16:49:35+5:302025-08-26T16:50:30+5:30
टोलबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन करणार..

महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा, अन्यथा..; मंत्री शंभूराज देसाईंचा महामार्ग प्राधिकरणला इशारा
सातारा : तीन ते चार वर्षे प्रलंबित सातारा-कोल्हापूरमहामार्गाचे काम मार्च २०२६ व कराड-चिपळूण महामार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. दोन्ही रस्त्यांच्या कामाचा दर १५ दिवसांनी बारचार्ट सादर करून त्यानुसार काम न झाल्यास किंवा कामामध्ये दिरंगाई झाल्यास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वत: फौजदारी गुन्हे दाखल करणार, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सातारा येथे पालकमंत्री कार्यालयात सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण महामार्गांच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आणि महामार्गाचे काम करत असलेल्या दोन्ही एजन्सींचे प्रतिनिधीही यांची बैठक झाली. यानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम तीन ते चार वर्षे रेंगाळले आहे. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि दोन्ही एजन्सीजनी पाऊस ओसरताच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द आम्ही बैठकीच्या इतिवृत्तात घेतला आहे. या मुदतीत काम न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.’’
सातारा-कोल्हापूर महामार्गावर स्वच्छतागृह आणि ट्रक टर्मिनस आदी सुविधा मिळणार काय, असा सवाल केला असता ‘डीपीआर’मध्ये तसे नमूद असेल तर या सुविधा देण्यात येतील, अन्यथा याचा पुरवणी प्रस्ताव द्यावा लागेल. तसेच महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून हे मोठे खड्डे भरण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. महामार्गावर पोलिसांनीही कोंडी टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात पॅट्रोलिंगच्या सूचना दिल्या असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
टोलबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन करणार..
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीमुळे वाहने थांबून असतात, तरीही टोल का द्यायचा, असा सवाल सरन्यायाधीश गवई यांनी केला होता. या अनुषंगाने छेडले असता देसाई म्हणाले, ‘‘या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाकडून जे आदेश प्राप्त होतील, त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.’’
भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करण्याच्या सूचना..
पाटण तालुक्यातील हुंबरळी गावात चार वर्षांपूर्वी भूस्खलन झालेले होते. त्यावेळी पाच घरे स्थलांतरित केली. त्यांचे कोयनानगर येथे पुनर्वसन केले आहे. उर्वरित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, हुंबरळीपासून दोन-तीन किलोमीटर परिसरात जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी..
‘पालकमंत्री आपल्या दारी’ ही नवीन कल्पना राबवणार असून, लोकांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात जाण्याऐवजी पालकमंत्रीच लोकांपर्यंत जाणार असून, गावागावांत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.