Crime News: खंडणीप्रकरणी पोलिस अधिकारी घनवटसह दोघांवर गुन्हा, व्यवसायिकाकडून १२ लाख घेतल्याचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:42 IST2023-03-28T20:41:00+5:302023-03-28T20:42:31+5:30
Crime News: सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस राईटर विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Crime News: खंडणीप्रकरणी पोलिस अधिकारी घनवटसह दोघांवर गुन्हा, व्यवसायिकाकडून १२ लाख घेतल्याचा उल्लेख
सातारा - सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस राईटर विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. त्याचबरोबर दोघांनी १२ लाख ३० हजार रुपये घेतल्याचेही व्यवसायिकेने तक्रारीत स्पष्ट केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस आणि तक्रारदारांकडून मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक राजेंद्र चोरगे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिस अधिकारी घनवट आणि हवालदार विजय शिर्के यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजेंद्र चोरगे यांची साताऱ्यातील शाहूनगरमध्ये गुरुकूल एज्यूकेशन सोसायटी ही संस्था आहे. ते या संस्थेचे १४ वर्षांपासून चेअरमन आहेत. संस्थेबाबत कोणतीही तक्रार नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट आणि राईटर विजय शिर्के यांनी गुरुकूल संस्थेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करुन गुन्हेगारांना मदत केली. तसेच शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या चाैकशीदरम्यान त्रास देऊन ब्लॅकमेल केले. इच्छा नसतानाही २५ लाखांची मागणी करुन १२ लाख ३० हजार रुपये दोघांनी घेतले आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी पोलिस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास देणे, पत्नी तसेच गुरुकुलच्या महिला प्रिन्सीपल आणि कर्मचाऱ्यांनाही सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दोघांची चारवेळा प्राथमिक व विभागीय चाैकशी केली. त्यांच्या अहवालात दोघांची कसुरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयात पोलिस अधिकारी घनवट व राईटर विजय शिर्के यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोघांच्याविरोधात गुन्हा नोंद करुन पुढील कारवाई करण्याबाबत पोलिसांना आदेश केला आहे, असेही या तक्रारीत राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केलेले आहे.