Satara: पत्रकाराला धमकी देणाऱ्या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:00 IST2023-09-29T18:59:19+5:302023-09-29T19:00:15+5:30
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजेंच्या संदर्भात प्रश्न विचारल्याने दिली होती धमकी

Satara: पत्रकाराला धमकी देणाऱ्या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
सातारा : सातारा शहरातील पत्रकाराला तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आल्याप्रकरणी प्रीतम कळसकरवर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा संबंधित कार्यकर्ता आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी पत्रकार सुजीत आंबेकर (रा. रविवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रीतम कळसकरवर (पूर्ण नाव व पत्ता नाही) गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सवा सातच्या सुमारास साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर धमकीचा प्रकार घडला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजेंच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावरुन प्रीतम कळसकरने पत्रकार आंबेकर यांना तुला जीवंत सोडणार नाही. तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पत्रकार सुजीत आंबेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रीतम कळसकरविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिस अधिकारी अधिक माहिती घेत आहेत.