CoronaVirus Lockdown : आधी हात धुवा मगच भाजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:08 IST2020-04-02T16:06:46+5:302020-04-02T16:08:19+5:30
सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव्हा येतात, तेव्हा पहिल्यांदा हात धुवा मगच भाजीला हात लावा, असे ते म्हणतात.

CoronaVirus Lockdown : आधी हात धुवा मगच भाजी घ्या
सागर गुजर
सातारा : सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव्हा येतात, तेव्हा पहिल्यांदा हात धुवा मगच भाजीला हात लावा, असे ते म्हणतात.
महादेव खुळे यांनी शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकामध्ये आपला भाजी स्टॉल लावला आहे. भाजी केंद्राच्या समोरच्या बाजूला एक दोरी बांधली असल्याने सुरक्षित अंतरावरूनच ग्राहक भाजी खरेदी करतात. त्यासोबतच त्यांनी भाजी केंद्र्राच्या लगत बेसिनची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पाण्याचा जार, हँडवॉश ठेवले आहे. भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी पहिल्यांदा हँडवॉशने हात धुवायचे, मगच ताज्या भाजीला हात लावायचा, असा त्यांनी नियम घालून दिला आहे.
याव्यतिरिक्त केवळ ग्राहकांना सूचना देत बसण्यापेक्षा स्वच्छतेचा संदर्भात त्यांनीही स्वत:ला काही आचारसंहिता घालून दिलेल्या आहेत. आपल्याजवळ ठेवलेला सॅनिटायझरने ते हात धुतात, मगच स्वत: भाजीला हात लावून ती ग्राहकांना देतात. भाजी केंद्र्रावर इलेक्ट्रॉनिक काट्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे मापात पाप करण्याचा प्रश्न येत नाही.
त्यासोबतच स्वच्छतेची देखील तितकीच काटेकोरपणे काळजी घेतली असल्याने संसर्ग रोखण्यास निर्बंधही घातला गेला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो, हे लक्षात घेऊन या भाजी केंद्र्रावर गुगल पे ची देखील व्यवस्था खुळे यांनी केलेली आहे. या सर्वच आधुनिक उपाययोजनांमुळे हा भाजी स्टॉल सर्वांसाठी लक्षवेधी ठरला आहे.
शहरातील प्रत्येक जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी आत्ताच्या घडीला ही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक कुवत असतानादेखील अनेक विक्रेते याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी महादेव खुळे यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.