Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे

By प्रमोद सुकरे | Updated: January 21, 2026 15:43 IST2026-01-21T15:41:35+5:302026-01-21T15:43:43+5:30

भाजपचा हा वारू रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकवटण्याची प्रक्रिया काहींनी सुरू केली

Congress test of strength for Karad Panchayat Samiti | Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे

संग्रहित छाया

प्रमोद सुकरे

कराड : कराडपंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोरदार सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एकच दिवस बाकी असताना राजकीय पक्ष व नेत्यांची समीकरणे रोज नवनवीन वळणे घेत आहेत. म्हणून तर कराड तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस एकत्रित येणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

अशातच सोमवारी वारुंजी गटाचे अर्ज शक्तिप्रदर्शनासह दाखल केल्यानंतर रात्री उशिरा सर्वच गट व गणात काँग्रेसने कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याचा सूचना दिल्याने काँग्रेस पुन्हा एकदा स्वबळासाठी चाचपणी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कराड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा व राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून कराडची ओळख आहे. या तालुक्यात १२ गट व २४ गणात निवडणूक होत आहे. कराड तालुक्यातील मतदार हा दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात विखुरला आहे .त्यामुळे येथील निवडणुकीवर ३ विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा प्रभाव कायमच दिसून येतो. आता तर कराड दक्षिण उत्तरेत भाजपचे आमदार आहेत तर पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिंदेसेनेकडे आहे.

सध्या सातारा जिल्ह्याबरोबरच कराड तालुक्यातील भाजपचा वाढता प्रभाव विरोधकांची डोकेदुखी ठरला आहे.म्हणूनच भाजपचा हा वारू रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकवटण्याची प्रक्रिया काहींनी सुरू केली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना व त्याचबरोबर काँग्रेसलादेखील सोबत घेऊन लढाई लढण्यासाठी काही नेतेमंडळी आग्रही आहेत. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

पण यातच सोमवारी रात्री काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांकडून मतदारसंघातील सर्वच पंचायत समिती गण व गटात अर्ज दाखल करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत. ही मंडळी मंगळवारी दिवसभर कागदपत्र जुळवण्याच्या प्रयत्नात दिसत होती. त्यामुळे काँग्रेस सर्व विरोधकांच्या मेळात एकत्रित असणार की पुन्हा एकदा स्वबळ अजमावणार? हे पाहावे लागणार आहे.

कराडातील प्रयोग यशस्वी!

कराड नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात शिंदेसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दोन्ही राष्ट्रवादींना सोबत घेऊन आघाडीचे पॅनेल रिंगणात उतरले होते. निकालानंतर यशवंत- लोकशाही आघाडीची सत्ता व थेट नगराध्यक्ष निवडून आल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे समोर स्पष्ट झाले आहे. तर मलकापूर नगरपालिका निवडणुकीतही कमी वेळात या प्रयोगाला बऱ्यापैकी पसंती मिळाली आहे.

‘हाता’ला काहीच लागलेले नाही बरं..

कराड नगरपालिका निवडणुकीतही अजित पवार राष्ट्रवादी व शिंदेसेना यांच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी एकत्रित लढण्यासाठी बैठका केल्या होत्या. मात्र ते जुळून आले नाही. मग काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह १३ ठिकाणी पक्ष चिन्हावर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या ''हाता''ला काहीच लागले नाही. तर थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मते समाधानकारक नाहीत. मलकापुरातही अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी तेथे काँग्रेसला संपूर्ण पॅनेलही उभे करता आले नाही अन् यशही मिळविता आले नाही.

आज अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार

येथील निवडणूक कार्यालयात मंगळवार अखेर तुलनेने इच्छुकांचे फारसे अर्ज दाखल झालेले दिसत नाहीत. त्यामुळे बुधवार दि. २१ रोजी शेवटच्या दिवशीच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल होतील अशी परिस्थिती आहे.

Web Title : सतारा: कराड पंचायत समिति चुनाव में कांग्रेस की शक्ति परीक्षा!

Web Summary : कराड पंचायत समिति चुनाव में बदलते राजनीतिक समीकरण। कांग्रेस स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने पर विचार कर रही है, जिससे मुकाबला प्रभावित हो सकता है। सबकी निगाहें कांग्रेस की रणनीति पर।

Web Title : Satara: Congress tests its strength for Karad Panchayat Samiti elections.

Web Summary : Karad Panchayat Samiti elections see shifting alliances. Congress considers contesting independently, impacting the election's competitive landscape. All eyes are on Congress's strategy.