काँग्रेस पक्षात फूट पडणार नाही; ...म्हणून कराडला स्वतंत्र लढण्याचा निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:11 IST2025-11-20T18:08:42+5:302025-11-20T18:11:56+5:30
Local Body Election: हातावर लढण्याची ॲलर्जी कशासाठी?

काँग्रेस पक्षात फूट पडणार नाही; ...म्हणून कराडला स्वतंत्र लढण्याचा निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
कराड : ‘बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, अशी कोणतीही फूट पक्षात पडणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. बुधवारी कराड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमित जाधव उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘कराड नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करा, थोडे मागेपुढे सरका, अशा सूचना मी शहर काँग्रेसला दिल्या होत्या. सुरुवातीला महाविकास आघाडीतील इतरांनी प्रतिसाद दिला; पण, नंतर आघाडी करू पण पक्षचिन्ह नको, अशी भूमिका मांडून काँग्रेसला उमेदवारीच्या जागाही अत्यल्प देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, नगराध्यक्षपदासह १६ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले आहेत. मी स्वतः काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नसेल तेथे समविचारी उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका आहे.’
हातावर लढण्याची ॲलर्जी कशासाठी?
कराड पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्यातच पक्षचिन्हावरून दोन मतप्रवाह निर्माण झाले. याबाबत छेडले असता हाताच्या चिन्हावर लढण्याची ॲलर्जी असण्याचे कारण काय? असा टोला त्यांनी संबंधितांना लगावला.
‘एका मराठमोळ्या कुटुंबाची कहाणी’
विधानसभा निवडणुकीनंतर मी मुंबई, दिल्लीमध्ये होतो. या काळात थोड्या तब्येतीच्याही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. पण, मिळालेल्या वेळात मी ‘एका मराठमोळ्या कुटुंबाची कहाणी’ हे पुस्तक लिहायला घेतले असून, त्याचे लवकरच प्रकाशन होईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.