दहिवडी : गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर माण तालुक्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकात काँग्रेसविरोधात सर्वपक्षीय एकत्र येऊन लढत आहेत. सर्वच विरोधक एकवटूनही आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा बँक, बाजार समिती, फेडरेशन, ग्रामपंचायती निवडणुकात यश मिळविले. पंचायत समितीचे उपसभापतिपद काँग्रेसकडे आले तर सभापतीही आ. गोरेंच्या संपर्कात राहात असल्याने तालुक्यातील सर्व सत्तास्थाने काँग्रेसने काबीज केली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीचा बोलबाला असताना माण तालुक्यात मात्र, काँग्रेसची घोडदौड कायम असल्याचे दिसत आहे. १९९९ पासून माण तालुक्यावर राष्ट्रवादीचा एकछत्री अंमल होता. २००९ मध्ये माण मतदारसंघ खुला झाला आणि काँग्रेसच्या आ. जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीची मक्तेदारी सर्व प्रथम मोडीत काढली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने माणमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला घरघर लागली. अगदी तळागाळात रुजलेल्या राष्ट्रवादीला आ. गोरेंनी पावलोपावली शह द्यायला सुरुवात केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळविले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतीही काँग्रेसच्या अधिपत्याखाली येऊ लागल्या. २०१४ पर्यंत माण तालुक्याच्या राजकारणात काँग्रेसचे वजन चांगलेच वाढले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी, रासप, शिवसेनेचे आव्हान मोडीत काढून काँग्रेसच्याच आ. गोरेंनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र, राजकारणाचा ट्रेंड बदलला. काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र येऊन लढण्याचा प्रघात सुरू झाला. सोसायट्यांच्या निवडणुकात तसे चित्र सुरुवातीला पाहायला मिळाले. काँग्रेसविरोधात रासप, राष्ट्रवादीने मोट बांधली. देवापूर ग्रामपंचायतीवर वर्चस्व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देवापूर ग्रामपंचायतीवर आजपर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, राष्ट्रवादीसह रासप, भाजपा, एकत्रित लढूनही काँग्रेसने इथे सत्तांतर घडविले. इंजबाव, वारुगड या ग्रामपंचायतींही ताब्यात घेतल्या. ‘अँटी इनकम्बन्सी’ फॅक्टर लागू झाल्याने शिंगणापूरची सत्ता ताब्यात ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले. (प्रतिनिधी)
विरोधक एकवटूनही काँग्रेसची घोडदौड
By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST
माण तालुका : अनेक निवडणुकीमध्ये यश
विरोधक एकवटूनही काँग्रेसची घोडदौड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}