कराड : कराड नगरपालिकेत सत्ताधारी गट व विरोधी पक्षनेते यांच्यातील सुप्त संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. शासकीय निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजन व बैठकींमधून विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. याबाबत त्यांनी चक्क जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
भूमिपूजन समारंभ वादाच्या भोवऱ्यात
केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेंतर्गत कराड नगरपरिषद शाळा क्र. ३ च्या १० कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन दि. १८ एप्रिल २६ रोजी पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले व जिल्ह्यातील काही मंत्री यांना निमंत्रित न करता केवळ सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकल्याचा गंभीर आरोप वाटेगावकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही डावलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही न वापरल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे.
‘म्हणे भूमिपूजन कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले माहिती नाही’
या कार्यक्रमाबाबत वाटेगावकर यांनी दि.१० एप्रिल २६ रोजी गटशिक्षणाधिकारी कराड यांच्याकडे माहिती मागवली होती. त्यावर गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी दि.२१ एप्रिल २६ रोजी पत्राद्वारे उत्तर दिले आहे की, ‘सदर बांधकाम स्टार प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत मंजूर आहे. मात्र सदर बांधकामाचे भूमिपूजन कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले याबाबतची माहिती या कार्यालयास उपलब्ध नाही.’ या उत्तरामुळे आता वादाला नवे वळण मिळाले आहे.
मुख्याधिकारी म्हणतात शालेय समितीचे आयोजन
वाटेगावकर यांनी याबाबत पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी २८ एप्रिल २६ रोजी वाटेगावकर यांना पत्र पाठवून खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘शिक्षण मंडळाच्या दि.२७ एप्रिल २६ च्या अहवालानुसार सदर कामाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन कराड नगरपरिषद शाळा क्र.३ चे शालेय व्यवस्थापक समितीमार्फत आयोजित केलेले आहे.’
वेगवेगळी उत्तरे आश्चर्यकारक
एकाच कार्यक्रमाबाबत शिक्षण विभाग व नगरपरिषद प्रशासन यांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. लोकप्रतिनिधींना डावलणे व विरोधकांच्या तक्रारींमुळे कराड पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी व भविष्यात प्रोटोकॉलचे पालन व्हावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सत्ताधारी गटाने मात्र यावर अजून तरी मौन बाळगले आहे.
Web Summary : Karad municipality faces conflict as opposition alleges exclusion from development work events. A complaint was filed regarding a school groundbreaking ceremony, with conflicting information from officials fueling the dispute. The opposition demands accountability and adherence to protocol.
Web Summary : कराड नगर पालिका में विकास कार्यों के कार्यक्रमों से विपक्ष को बाहर रखने का आरोप है। स्कूल के शिलान्यास समारोह पर विवाद, अधिकारियों से मिली जानकारी से विवाद और बढ़ गया है। विपक्ष ने जवाबदेही और प्रोटोकॉल के पालन की मांग की है।