Local Body Election: कराडमध्ये उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचीही तोफ धडाडणार!
By प्रमोद सुकरे | Updated: November 28, 2025 16:35 IST2025-11-28T16:34:25+5:302025-11-28T16:35:18+5:30
काँग्रेसचं चाललंय काय..

Local Body Election: कराडमध्ये उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचीही तोफ धडाडणार!
प्रमोद सुकरे
कराड : कराड व मलकापूर नगरपालिकेची निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी चिन्ह मिळाल्यापासून प्रचाराला मोठी गती आली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी सायंकाळी कराडला शिंदेसेना आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. तर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, दि. ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभेचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते नेमके काय काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कराड तालुक्यात कराड व मलकापूर अशा २ नगरपालिका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण भलतेच तापले असून, महायुती व आघाडीतच बिघाडी झाली आहे. राज्यात महायुती म्हणून एकत्रित काम करणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अशावेळी हे नेते प्रचार सभेमध्ये नेमके काय बोलणार? ते पाहणे महत्त्वाचे आहे.
कराडला आमदार अतुल भोसलेंनी भाजपच्या चिन्हावर पॅनल उभे केले आहे तर शिंदेसेनेच्या राजेंद्र यादवांनी स्थानिक आघाडीला प्राधान्य देत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिवाय काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. मलकापुरात भाजपने नाट्यमय घडामोडी करत विरोधी नेत्यांनाच भाजपमध्ये घेऊन मोठी खेळी केली. त्यामुळे ६ उमेदवार बिनविरोध करत आमदार भोसलेंनी विजयाचा षटकार मारला आहे. तरी देखील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील यांनी समविचारींना बरोबर घेत इतर जागांवर उमेदवार उभे करत लढत उभी केली आहे.
काँग्रेसचं काय चाललंय..
कराड पालिकेत काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह १६ उमेदवार उभे केले आहेत. तर मलकापूरमध्ये केवळ काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढतोय. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तळ ठोकून आहेत. ते कोपरा सभा घेतच आहेत. याशिवाय छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्याही दौऱ्यांचे आयोजन सुरू असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यातून समजते.
मकरंद पाटलांचीही आज सभा
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी ११ उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आहेत. तर कराडला फक्त २ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री मकरंद पाटील यांची सभा शुक्रवार, दि. २८ रोजी मालकापूरला होणार आहे.