Satara: आंबेनळी घाटात १०० फूट खोल दरीत कार कोसळली, अपघातस्थळी मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:56 IST2025-12-25T15:55:54+5:302025-12-25T15:56:38+5:30
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर सरजन रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल

Satara: आंबेनळी घाटात १०० फूट खोल दरीत कार कोसळली, अपघातस्थळी मदतकार्य सुरू
महाबळेश्वर : आंबेनळी घाटात एक कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आज, गुरुवारी (दि.२५) हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर सरजन रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. खोल दरी, घनदाट जंगल आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत असले, तरी दोरखंड, सुरक्षासाधने व आवश्यक उपकरणांच्या साहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघातग्रस्त वाहनात किती प्रवासी होते आणि त्यांची स्थिती काय आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पोलीस वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत.
महाबळेश्वर परिसरातील आंबेनळी घाटात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर जखमींबाबतचा सविस्तर माहिती समोर येणार आहे.