हॉटेलमध्ये पार्ट्या करण्यासाठी चक्क घरफोडीचा फंडा ; १५ घरफोड्या उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:06 IST2019-12-26T19:04:48+5:302019-12-26T19:06:07+5:30
अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते.

सातारा येथे गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेने चोरीप्रकरणी पाच युवकांना अटक केली. हे युवक केवळ मौजमजेसाठी चोरी करत होते.
सातारा : काहीही कामधंदा न करता रोज हॉटेलमध्ये पार्ट्या करण्यासाठी चक्क घरफोडीचा फंडा अंमलात आणणाऱ्या पाच युवकांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून पंधरा घरफोड्या उघडकीस आल्या असून, चोरीचा दीड लाखाचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.
अक्षय मारुती गायकवाड (वय २६), अविनाश बाबासो चव्हाण (२९, दोघेही रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विष्णू प्रकाश जठार (२६, रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव), संतोष यशवंत घोरपडे (२८,रा. चोरगेवाडी, ता. कोरेगाव), सुशांत दत्तू लोकरे (३८, रा. चोराडे, ता. खटाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कुठलाही कामधंदा न करता वरील पाच युवकांचे राहणीमान अत्यंत चांगले होते. रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ते पार्ट्या करायचे. अचानक या युवकांच्या वागण्यात झालेला बदल जागृत नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती दिली. त्यानुसार एलसीबीने वेगवेगळ्या दोन टीम तयार करून रहिमतपूर परिसरात पाठविल्या. एका-एकाला सापळा रचून पोलिसांनी अखेर अटक केली.
अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते. लोकरे याच्यावर चोरीचा माल विकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. एकदा चोरीचा ऐवज विकल्यानंतर पुन्हा लोकरेने या आरोपींचा माल विकून दिला. त्यामुळे या आरोपींचे धाडस वाढत गेले, असे तपासात समोर आले आहे.
रहिमतपूर, बोरगाव, पाटण, औंध, उंब्रज परिसरातील शाळा, दुकाने, पानटपºया, हॉटेल्स, मोबाईल शॉपी अशा १५ घरफोड्या या टोळीने केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून प्रोजेक्टर, स्कॅनर, प्रिंटर, ९ एलसीडी मॉनिटर, ३ सीपीयू, ६ किबोर्ड असा एकूण दीड लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, राजू ननावरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नितीन भोसले आदींनी या कारवाईत भाग घेतला.