सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड
By दत्ता यादव | Updated: October 1, 2022 16:32 IST2022-10-01T16:32:36+5:302022-10-01T16:32:59+5:30
घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस

सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड
सातारा : आजीच्या घरात लपून बसलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने काल, शुक्रवारी रात्री उशिरा केली.
अभिषेक गणेश आवारे (वय २०, रा. आकाशवाणी केंद्राजवळील, झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाशवाणी केंद्राजवळील एका गोदामातून साहित्य चोरीला गेले होते. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, ही घरफोडी करणारा आकाशवाणी केंद्राजवळ राहणाऱ्या आजीच्या घरात लपला असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तेथे जाऊन अभिषेकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने गोदामातील चोरीसह अन्य एका ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.