Satara Crime: राणंद येथे वृद्धेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून, जमिनीच्या वादाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:36 IST2025-09-11T13:35:29+5:302025-09-11T13:36:00+5:30
पोलिसांकडून तपास सुरू

Satara Crime: राणंद येथे वृद्धेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून, जमिनीच्या वादाचा संशय
दहिवडी : माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर एका वृद्धेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा खून जमिनीच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हिराबाई दाजी मोटे (वय ७५), असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत हिराबाई मोटे यांची मुलगी संगीता खाशाबा कोळेकर या नेहमीप्रमाणे शेतातील कामावरून सोमवार, दि. ८ रोजी घरी परतल्या. तेव्हा आई घरी आढळून न आल्याने त्यांनी त्यांचा भाऊ दत्तात्रय मोटे यांना फोन करून सांगितले. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेदहा वाजता संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले. त्यांना हिराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. डोक्यात दगड घालून निर्घृण करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शिखर शिंगणापूरचे पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सहा नातवंडे असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत.