Satara: दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, उत्पादन शुल्कच्या जवानासह एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:26 IST2025-02-07T14:26:03+5:302025-02-07T14:26:32+5:30
सातारा : दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड विभागातील उत्पादन शुल्कचा जवान भीमराव शंकर माळी ...

Satara: दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, उत्पादन शुल्कच्या जवानासह एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा : दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड विभागातील उत्पादन शुल्कचा जवान भीमराव शंकर माळी (वय ३७, रा. मलकापूर कऱ्हाड) व खासगी व्यक्ती मुस्तफा मोहिदिन मणियार (वय २५, रा. मलकापूर, लक्ष्मीनगर, ता. कऱ्हाड) यांना सांगली येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि. ५ रोजी सायंकाळी कऱ्हाड येथे करण्यात आली.
तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये कऱ्हाड विभागाच्या उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांनी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी करवाई केली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व पुन्हा दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे जवान भीमराव माळी याने ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपतच्या कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्यानंतर सांगलीतील एसीबीच्या पथकाने शहानिशा केली असता जवान भिमराव माळी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सांगली एसीबीच्या पथकाने बुधवारी कऱ्हाड येथे सापळा लावला. त्यावेळी माळी याने खासगी व्यक्ती मुस्तफा मणियार याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी मणियार याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सांगली लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस काॅन्स्टेबल ऋषीकेश बडणीकर, प्रीतम चाैगुले, सुदर्शन पाटील, विठ्ठल रजपूत यांनी केली. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सातारा लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन राऊत हे करीत आहेत.