‘त्या’ युवतीचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनी सापडला, कऱ्हाडात कृष्णा नदीपात्रात मारली होती उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:13 IST2025-08-04T16:12:08+5:302025-08-04T16:13:30+5:30
संबंधित मृतदेह कल्पनाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नातेवाइकांना माहिती देण्यात आली

‘त्या’ युवतीचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनी सापडला, कऱ्हाडात कृष्णा नदीपात्रात मारली होती उडी
कऱ्हाड : येथील कृष्णा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय २६, रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मुळ रा. जत, जि. सांगली) या युवतीने उडी घेतली होती. या युवतीचा मृतदेह सहा दिवसांनी गोंदी गावच्या हद्दीत नदीपात्रात आढळून आला.
रविवारी सकाळी पात्रात मृतदेह तरंगताना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
कऱ्हाड येथे राहणाऱ्या कल्पना वाघमारे या युवतीने सोमवारी, दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णा नदीपात्रात उडी घेतली. कल्पनाचे लग्न ठरले होते. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडाही झाला होता. घटनेनंतर एनडीआरएफचे जवान तसेच मच्छीमारांकडून नदीपात्रात शोध घेण्यात आला. गत ६ दिवसांपासून तिचा शोध घेतला जात होता.
रविवारी सकाळी गोंदी हद्दीतील नदीपात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित मृतदेह कल्पनाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नातेवाइकांना माहिती देण्यात आली.