Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू
By दत्ता यादव | Updated: January 2, 2025 15:09 IST2025-01-02T15:08:37+5:302025-01-02T15:09:00+5:30
सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. ...

Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू
सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला असल्याचे दिसून आले. त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले. संजय शेलार (वय ३५, रा. अंधारी, ता. जावळी), असे मृत तरुणाचे नाव आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार आणि धरणापासून काही अंतरावर फळणी हे गाव लागते. या गावच्या हद्दीत अंधारी बस स्टॉप आहे. या थांब्याच्या एस वळणाच्या खालील बाजूस असलेल्या झाडीत काही नागरिकांना गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला.
माहिती मिळताच मेढा आणि सातारा तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जागेवरच पंचनामा केल्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. त्याच्या गळ्यावर काही खुणा दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेढा पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.