Satara: कराडातील लॅबोरेटरीत डॉक्टरांशिवाय रक्त, लघवीची तपासणी; १७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:14 IST2025-12-11T13:13:47+5:302025-12-11T13:14:50+5:30
दोन डॉक्टरांसह लॅब चालवणाऱ्यांचा समावेश

संग्रहित छाया
कराड : कराड येथील भेदा चौकातील मेट्रो पोलिस हेल्थ केअर लिमिटेड लॅबोरटरीत रक्त, लघवीच्या तपासणी त्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसहित कराडातील १७ जणांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये दोन डॉक्टरांसह लॅब चालवणाऱ्यांचा समावेश आहे.
लॅबच्या प्रकरणात डॉ. सुशील शहा व डॉ. स्मिता सुडके (दोघे, रा. पुणे) अमिरा सुशील शहा व विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलिंद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव व कमलेश कुलकर्णी (सर्व, रा. नवी मुंबई), विनायक दंताल (रा. कोल्हापूर), योगिनी व्यास, सतीश जाधव, विद्याधर भागवत, प्रवीण कांबळे, सचिन मोरे, सुषमा चव्हाण, अनिलकुमार जाधव (सर्व रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तपासणीला आलेल्या रक्त लघवीच्या तपासणी अहवालावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरी वापरून ते लोकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. डॉ. संदीप यादव यांनी दिलेल्या फिर्यादवरून टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत त्या लॅबवर कारवाई केली आहे.
पॅथॉलॉजिस्ट डॉ. संदीप यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कराड शहरातील भेदा चौक येथे मेट्रो पोलिस हेल्थ केअर लिमिटेड नावाने फेब्रुवारी २०२३ पासून लॅबोरेटरी कार्यरत होती. तेथे रुग्णाचे रक्त, लघवीचे नमुने घेतले जात होते. त्यांच्या चाचण्या करून त्याचा अहवाल तज्ज्ञ डॉ. स्मिता सुडके यांच्या नावाने दिला जात होता. मात्र, त्यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी, नाव व शैक्षणिक पात्रता याचा वापर केला जात होता.
आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक..
मेट्रो पोलिस हेल्थ केअर लिमिटेडसह कंपनीचे संचालक डॉ. सुशील शहा, संचालक अमिरा सुशील शहा, विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलिंद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव, कमलेश कुलकर्णी, व्यवस्थापक विनायक दंताल, येथील शाखेचे भागीदार विद्याधर भागवत, डॉ. स्मिता सुडके, लॅबोरेटरीत काम करणारे कर्मचाऱ्यांनी लोकांची फसवणूक केली. विद्याधर भागवत, प्रवीण कांबळे, सुषमा चव्हाण, अनिल जाधव, योगिनी व्यास, सतीश जाधव, सचिन मोरे यांनी पॅथॉलॉजिस्ट प्रत्यक्षात हजर नसताना त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या स्वाक्षरीचे चाचणी अहवाल तयार केले आहेत. त्यावर डॉ. सुडके यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी छापली त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.