सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:03 IST2025-11-15T16:02:44+5:302025-11-15T16:03:38+5:30
Local Body Election: डावपेचांनी वाढविली रंगत...

सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास’ आघाडी असा थेट राजकीय संघर्ष अपेक्षित असताना, भाजपने अवलंबलेल्या ‘गुंतागुंतीच्या’ उमेदवारी धोरणामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपने निवडणुकीची सूत्रे पूर्णपणे आपल्या हाती घेतली असून, उमेदवारी यादी जाहीर न करण्यामागे ‘गनिमी कावा’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक यंदा सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. स्थानिक आघाड्या बाजूला सारत भाजपने या पालिकेची सूत्रे आपल्या हाती घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगरसेवक पदाच्या ५० जागांसाठी तब्बल ३८७ इच्छुकांनी रांग लावल्याने पक्षांतर्गत बंडखोरीचा धोका भाजपला स्पष्टपणे दिसत होता.
जर उमेदवारांची यादी तातडीने जाहीर केली असती, तर डावललेले आणि नाराज झालेले मातब्बर उमेदवार थेट महाविकास आघाडीच्या गळाला लागले असते. त्यामुळे भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्यात विलंब लावला आहे. भाजपने मोहोर उमटविलेल्या नावांची यादी अंतिम क्षणी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात असून, ज्यांचा ‘पत्ता’ कट होणार? त्यांचे राजकीय भवितव्य काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
ही आहेत प्रमुख कारणे..
- भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्यास लावलेला विलंब हा बंडखोरी टाळण्यासाठी केलेला ‘गनिमी कावा’ आहे.
- अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे लपवून ठेवल्यामुळे, महाविकास आघाडीला नाराज बंडखोरांना सामावून घेण्यासाठी, त्यांच्यावर विश्वास दाखविण्यासाठी किंवा त्यांना ताकद देण्यासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही.
- महाविकास आघाडीची आयत्या वेळेची ‘उमेदवार मिळविण्याची’ रणनीती पूर्णतः विस्कळीत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे.
डावपेचांनी वाढविली रंगत...
- महाविकास आघाडीने साताऱ्यात गुरुवारी घेतलेल्या मुलाखतीत इच्छुकांची संख्या कमी जाणवली. सोमवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. भाजपची ही खेळी विरोधकांना किती नामोहरम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- मात्र, महाविकास आघाडीदेखील ऐनवेळी ‘दोन राजें’च्या गडातील मोठ्या आणि नाराज शिलेदारांना तिकीट देऊन निवडणुकीत मोठी चुरस निर्माण करू शकते.
- साताऱ्याच्या राजकारणात येत्या दोन दिवसांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असून, अंतिम फैसला जनतेच्या दरबारात होण्यापूर्वी डावपेचांनीच निवडणुकीत रंगत आणली आहे.