काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: May 10, 2025 19:44 IST2025-05-10T19:43:40+5:302025-05-10T19:44:23+5:30

दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच

BJP is becoming Congress affiliated in the name of making India Congress free says State President of Congress Harshvardhan Sapkal | काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

कराड : काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला आहे हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराड येथे बोलताना लगावला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शनिवारी दुपारी कराड येथे आले होते.त्यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील- चिखलीकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, तालुकाध्यक्ष निवास थोरात, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, अमित जाधव, रणजित देशमुख, शेरखान पठाण, तात्या पाटील आदींची उपस्थिती होती.

सपकाळ म्हणाले, काँग्रेसची भूमिका ही नेहमी भारत जोडोची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली तर आम्हाला आनंदच होईल. 

..त्यामुळे आघाडी करावी लागली

खरंतर गतकाळात आघाडीची अपरिहार्यता होती. त्यामुळे राजकारणात आम्हाला आघाडी करावी लागली. त्याचेच मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागले. मात्र आता आम्ही नव्याने काँग्रेसची बांधणी चांगल्या पद्धतीने करणार आहोत.असेही सपकाळ एका प्रश्नावर म्हणाले.

'तो' निर्णय स्थानिक पातळीवरच

सन २०२५ हे वर्ष पक्षाने संघटनात्मक वर्ष जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षित फेरबदल, दुरुस्त्या होतील या शंका नाही. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या स्वतंत्र लढवायच्या ही स्थानिक पातळीवर पुन्हा आघाड्या करूनच लढवायच्या हा निर्णय जिल्हास्तरावरील स्थानिक नेते घेतील. तशी मोकळीक त्यांना देण्यात आली असल्याचेही ते एका प्रश्नावर म्हणाले. 

काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही

काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले तर काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही. कारण भारताचा आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए एकच आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढच्या काळामध्ये काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे कोणी ओसाड गावची पाटीलकी माझ्याकडे आली असे म्हणत असेल तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास 

सध्या ऑपरेशन सिंदूर सरकारने सुरू ठेवले आहे. त्याबाबत सगळे पक्ष सरकारच्या पाठीशी असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत छेडले असता सपकाळ म्हणाले, खरंतर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मोडून तोडून ते दाखवले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर सगळ्यांनी एकत्रीत सामोरे जाण्याची आहे हे समजून घेतले पाहिजे.

Web Title: BJP is becoming Congress affiliated in the name of making India Congress free says State President of Congress Harshvardhan Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.