Satara: ‘ते’ झोपेतून उठले, दरोडेखोरांना भिडले; अक्रित घडण्यापूर्वी लोकांनाही जागे केले; मेणवलीतील थरारक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:42 IST2024-12-31T13:41:41+5:302024-12-31T13:42:07+5:30
सातारा: गाढ झोपेत असताना हाॅलमधील लाइट सुरू झाली. आवाजाने जाग आली म्हणून पाहिलं तर मध्यरात्री घरात दहा ते बारा ...

Satara: ‘ते’ झोपेतून उठले, दरोडेखोरांना भिडले; अक्रित घडण्यापूर्वी लोकांनाही जागे केले; मेणवलीतील थरारक कहाणी
सातारा: गाढ झोपेत असताना हाॅलमधील लाइट सुरू झाली. आवाजाने जाग आली म्हणून पाहिलं तर मध्यरात्री घरात दहा ते बारा दरोडेखोर हातात कोयता, चाकू, लाकडी दांडके घेऊन घुसले होते. काय करावं हे समजलं नाही. पण, धाडस करून एका दरोडेखोरांशी झटापट केली. मागचा दरवाजा उघडून बाहेर गेलो, तर बाहेरही एक दरोडेखोर होता. त्याच्याशीही चांगलीच हातापायी झाली. कसाबसा तेथून शेतात धाव घेतली. अन् लोकांना जागं केलं. अजून काही वेळ दरोडेखोर घरात थांबले असते, तर भलतचं घडलं असतं, असे चिंतीत होऊन वाई तालुक्यातील मेणवलीतील भूषण कोचळे ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.
मेणवली येथे भूषण कोचळे आणि त्यांचा भाऊ एकत्र राहतात. भूषण कोचळे हे पाचगणी येथे एका खासगी शाळेवर शिक्षक आहेत. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घरावर दहा ते बाराजणांनी सशस्त्र दरोडा टाकून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. या धक्क्यातून हे कुटुंबीय अद्याप सावरले नाही. पैसे, दागिने नेले, त्याचे कुटुंबीयांना काहीही वाटले नाही. परंतु, पैशांपेक्षा घरातील स्त्रिया, लहान मुले यांच्या बाबतीत उलटसुलट घडलं नाही. याचे समाधान त्यांना आहे. अजून काही मिनिटे घरात चोरटे थांबले असते, तर कदाचित भलतंच घडलं असतं, असं काळजीच्या सुरात भूषण कोचळे सांगू लागले.
बेडरुममध्ये दोन लहान मुली, एक मुलगा, वहिनी आणि भाऊ होता. दरोडेखोरांनी झोपलेल्या लहान मुलीच्या आणि झोपेतून जागे झालेल्या १२ वर्षांच्या प्रियाच्या गळ्याला चाकू लावला. ओरडू नका, काय असेल ते द्या, असं म्हणून त्यांनी बॅगा तपासण्यास सुरुवात केली. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांचा भाऊ बेडवर गप्प बसला होता. साधारण वीस मिनिटे दरोडेखोर बॅगा, कपाट तपासत होते. याचदरम्यान माझी दरोडेखोरांशी झटापट सुरू होती. त्यांच्या तावडीतून कसाबसा निसटून ओरडतच घराबाहेर पडलो. त्यामुळे लोक जागे होतील, याची धास्ती दरोडेखोरांना लागल्याने त्यांनी घरातून धूम ठोकली, असं भूषण कोचळे यांनी सांगितलं.
‘त्यांच्या’ नजरासुद्धा वेगळ्या होत्या
संबंधित दरोडेखोर २० ते २२ वर्षांच्या वयोगटातील होते. त्यांच्या नजरासुद्धा वेगळ्या होत्या. त्यांना लवकरात लवकर घरातून हाकलण्यात मला यश आलं. अन्यथा नको ते घडलं असतं, असा भूषण कोचळे यांनी ‘त्या’ दिवशीचा थरार ‘लोकमत’शी कथन केला.