भोसरे ग्रामस्थांनी बनवलं सांडपाणीमुक्त गाव- प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:35 IST2019-06-08T19:31:58+5:302019-06-08T19:35:45+5:30
गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील

भोसरे ग्रामस्थांनी बनवलं सांडपाणीमुक्त गाव- प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे ।
सातारा : गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने शोषखड्डे खणले असून, आपल्या घरातील सांंडपाणी गटारात न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले. त्यामुळे गाव तर सांडपाणीमुक्त झालेच आहे. त्याचबरोबर गावातील रोगराई नष्ट करण्यास मदत झाली आहे.
सांडपाणी म्हणजे घरातून बाहेर पडणारे वापरलेले पाणी. त्यात शौचालय, स्वयंपाक घर, न्हाणीघर यातून बाहेर पडणारे पाण्याचा समावेश असतो. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. हे पाणी गटारात किंवा रस्त्यावर मोकळे सोडले तर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते. डासांची अंडी घालायला जाग मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारख्ेया आरोगांचा संसर्ग होतात. या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य न लावण्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतो.
या पाण्याचा पर्यावरणावर देखील परिणाम विपरीत परिणाम होत असतो. यावर मात करण्यासाठी भोसरे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घरोघरी शोषखड्डे खणण्याचा निर्णय घेतला. त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्यामुळे आज गावात ५५० शोषखड्डे असून, काही लोकांना जागा नाही, अशा व्यक्तींसाठी एक सामूहिक शोषखड्डा खणला आहे. यामुळे गावातील एकाही घरातून सांडपाणी गटार व रस्त्यावर सोडले जात नाही. त्यामुळे गावातील घाण, दुर्गंधी दूर होऊन रोगराई दूर होण्यास मदत झाली आहे.
बंद पडलेल्या कूपनलिका झाल्या रिचार्ज
खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी मागील चार वर्षांपासून चांगलीच कंबर कसली. यामध्ये भोसरे गावानेही उडी घेतली. मागील तीन वर्षांत गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी श्रमदान व मशीनच्या माध्यमातून पाणलोट विकासाचे काम उभे केले. त्यामुळे शिवारातील पाण्याची पातळी वाढली; मात्र गावठाणातील कूपनलिका बंद पडल्या होत्या. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करून घरोघरी शोषखड्डे खणले. या शोषखड्ड्यांमुळे गावात वापरलेले पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे गावातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिका पूर्ण रिचार्ज झाल्या आहेत.