मायणी : खटाव तालुक्याचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मोहनराव ऊर्फ भाऊसाहेब पांडुरंग गुदगे यांचे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मायणी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांचे सासरे, तर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे ते वडील होत. भाऊसाहेब गुदगे यांनी सलग चार वेळा विधानसभेत खटाव तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सरपंच, पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. त्यांची प्राणज्योत शनिवारी मायणी येथील निवासस्थानी मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मायणी परिसरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, बसवराज पाटील, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, हणमंतराव साळुंखे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, मायणी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, संचालक महादेव देशमुख, अरविंद पुस्तके, श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, तहसीलदार विवेक साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, डॉ. सयाजी पवार, डॉ. शशिकांत कुंभार, नंदकुमार मोरे, प्रदीप विधाते यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन गुदगे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मायणीतील त्यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी सहा वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. (वार्ताहर)
भाऊसाहेब गुदगे यांचे निधन
By admin | Updated: August 9, 2015 00:46 IST