सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:28 IST2025-08-06T13:27:26+5:302025-08-06T13:28:07+5:30
त्यामुळे त्याच्यावर बसला होता विश्वास

संग्रहित छाया
सातारा : येथील सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे बनविण्यासाठी दिलेली १५ लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागिरांनी गावी पलायन केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुस्तकीन बंगाली (रा. डफर चाैक, लाहाट, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक दिनेश दत्तात्रय देशमुख (वय ४४, रा. बसाप्पा पेठ, करंजे सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, बंगाली कारागीर मुस्तकीन हा सध्या कोरेगाव येथे राहत होता. तो साताऱ्यात येऊन दागिने बनविण्यासाठी घेऊन परत कोरेगावला जायचा. त्यानंतर तयार झालेले दागिने परत आणायचा.
गेल्या दोन वर्षांपासून तो विश्वासाने दागिने आणून देत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला होता. काही दिवसांपूर्वी १५ तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे त्याच्याकडे वेडणं बनविण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, हे दागिने परत न देता तो अचानक गायब झाला.
तो राहत असलेल्या कोरेगाव येथे जाऊन माहिती घेतली असता त्याच्यासोबत असलेले अन्य सहा कारागीरही पळून गेले असल्याचे त्यांना समजले. अशाच प्रकारे आणखी व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचेही समोर येत आहे. पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे अधिक तपास करीत आहेत.