स्वच्छ पाटणसाठी घंटागाडी नक्कीच उपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:37+5:302021-04-02T04:40:37+5:30
रामापूर : पाटण नगरपंचायत झाल्यापासून शहरात विविध विकासकामे सुरूच आहेत. पाटण शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्नशील ...

स्वच्छ पाटणसाठी घंटागाडी नक्कीच उपयोगी
रामापूर : पाटण नगरपंचायत झाल्यापासून शहरात विविध विकासकामे सुरूच आहेत. पाटण शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शहरातील विविध भागातून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीने आणलेल्या घंटा गाडी नक्कीच उपयोगी ठरतील. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीतच टाकावा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण नगरपंचायतीकडून शहरातील कचरा गोळा करण्यासाठी चार घंटागाडी खरेदी केल्या आहेत. त्यांचा लोकार्पण नगरपंचायतीच्या प्रांगणात कोविडचे नियम पाळून पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जानुगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेविका सरस्वती खैरमोडे, सुषमा महाजन, योगीता कुंभार, अनिता देवकांत, नगरसेवक किरण पवार, उमेश टोळे, ॲड. सचिन देसाई यांची उपस्थिती होती.
मुख्याधिकारी अभिषेक परदेशी म्हणाले, ‘शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीने चार घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्यात कोणतीही अडचण आता येणार नाही. नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. त्याचबरोबर घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपंचायतीकडून भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध केली आहे. त्याठिकाणी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आहे.’
यावेळी शहरात घंटागाड्या रोजच्या रोज फिराव्यात. कचरा गाडीत कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीकडून गाडीवर स्वतंत्र कर्मचारी नेमावा. आठवड्यातून एकदा तरी गटर स्वच्छ करावेत. गटर साफ केल्यानंतर तत्काळ कचरा उचलावा. चिकन व्यावसायिकांकडून पाटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज सायंकाळी घाण टाकली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथरोग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी. शहरातील सोयी-सुविधांबाबतच्या सूचना नागरिकांनी यावेळी केल्या. यावर नगरपंचायतीकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून नागरिकांना सहकार्य केले जाईल. नागरिकांनीही नगरपंचायतीला सर्वोतोपरी सहकार्य करावेत, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अजय कवडे यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष अजय कवडे यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष विजय टोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विलासराव क्षीरसागर, दीपक पाटणकर, दिलीप मोटे, माजी उपसरंपच चंद्रकांत मोरे, राजाभाऊ कांबळे, आबासाहेब भोळे, नामदेव कुंभार, मनीष मोळावडे, अनिल बोधे उपस्थित होते.