Satara-ZP Election: सातारा ‘झेडपी’च्या ६५ गट अन् पंचायत समितींच्या १३० गणांसाठी रणसंग्राम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:19 IST2026-01-14T18:18:41+5:302026-01-14T18:19:02+5:30
तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक; इच्छुक लागले तयारीला

Satara-ZP Election: सातारा ‘झेडपी’च्या ६५ गट अन् पंचायत समितींच्या १३० गणांसाठी रणसंग्राम
सातारा : राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणूक जाहीर केली. यासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्याही ६५ गट आणि ११ पंचायत समितीतील १३० गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर आता तब्बल नऊ वर्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार असल्याने इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींसाठी निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. यामुळे मुदत संपल्यानंतर जवळपास पावणेचार वर्षांनी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात पुढील तीन आठवड्यांहून अधिक काळ राजकीय धुरळा उडणार आहे.
तसेच, या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनानेही तयारी केलेली आहे. त्यानुसार आता प्रत्यक्षात १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असलेतरी या निवडणुकीत एकत्र येणार की स्वतंत्र लढणार हे येत्या काही दिवसांतच समोर येईल. तसेच, महाविकास आघाडीही एकत्रित निवडणूक लढविणार का, याची उत्सुकता आहे.
...म्हणून सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींची निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील आरक्षण मर्यादा ही ३८.४६ टक्के आहे. तसेच ११ पंचायत समितींमधीलही आरक्षण ५० टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील निवडणूक होत आहे.
जिल्हा परिषदेतील ४० गट खुल्या प्रवर्गासाठी...
जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ७, जमाती प्रवर्ग एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी १७ असे एकूण २५ गट राखीव झालेले आहेत. तर सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ४० गट आहेत.
पंचायत समितीत ४३ गण राखीव...
जिल्ह्यातील ११ पंचायत समितींत एकूण १३० गण आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३, ओबीसींसाठी ३० गण राखीव झाले आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकही गण आरक्षित नाही. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८७ गण आहेत.
तालुकानिहाय गट अन् गण संख्या
महाबळेश्वर - ०२ - ०४
वाई - ०४ - ०८
खंडाळा - ०३ - ०६
फलटण - ०८ - १६
माण - ०५ - १०
खटाव - ०७ - १४
कोरेगाव - ०६ - १२
सातारा - ०८ - १६
जावळी - ०३ - ०६
पाटण - ०७ - १४
कराड - १२ - २४