Satara: तलवार अन् कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:39 IST2024-03-11T12:39:14+5:302024-03-11T12:39:49+5:30

सातारा : कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना १२ ...

At the point of sword and ax he robbed and stole sugarcane in satara | Satara: तलवार अन् कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरला

संग्रहीत छाया

सातारा : कारखान्यात ऊस ताेडून नेत असताना तलवार, कुऱ्हाडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस चोरून नेला. ही घटना १२ डिसेंबर २०२३ रोजी घडली असून, याची तक्रार न्यायालयाच्या आदेशानुसार दि. ९ मार्च रोजी रात्री आठ वाजता बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन राजाराम पवार (वय ७२), महादेव राजाराम पवार ( ७०), नंदा महादेव पवार (वय ६०), सुशांत मनोहर पवार (वय ३२), धोंडीराम राजाराम पवार (वय ६५), भरत महादेव पवार (वय २६), दत्तात्रय बबन पवार (वय ३५), सूरज शितोळे (वय २९, सर्व रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वनिता मनोहर यादव (वय ५७, रा. आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) यांच्या शेतातील ऊस कामगारांमार्फत तोडून कारखान्यात नेला जात होता. १२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता वरील संशयितांनी हातात तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन ‘आडवा आला तर तुकडे करून टाकू,’ अशी ऊसतोड कामगारांना धमकी दिली. त्यानंतर तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये भरून जबरदस्तीने चोरून नेला.

याबाबत फिर्यादी वनिता यादव यांनी न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार वरील संशयितांवर शनिवार, दि. ९ रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: At the point of sword and ax he robbed and stole sugarcane in satara