Satara Crime: मध्यरात्रीस घरात घुसून अज्ञातांनी केली मारहाण, एकजण जखमी; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:02 IST2023-02-15T16:02:05+5:302023-02-15T16:02:28+5:30
घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही

Satara Crime: मध्यरात्रीस घरात घुसून अज्ञातांनी केली मारहाण, एकजण जखमी; कारण अस्पष्ट
फलटण : तांबमळा, फरांदवाडी (ता. फलटण) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला. मनीष प्रकाश ओझर्डे (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने तांबमळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनीष ओझर्डे हे तांबमळा फरांदवाडी येथे कुटुंबासोबत राहतात. सोमवारी (दि १३) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी घराबाहेर येवून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मनीष हे घाबरून घराबाहेर आले नाहीत. अज्ञातांनी त्यांना धमकी दिल्याने ते घराबाहेर आले. दरम्यान अज्ञातांनी त्यांचे तोंड बाधून धारदार शस्त्राने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरात पत्नी व्यतिरिक्त कोणीही नसल्याने त्यांना वाचवण्यास कोणी आले नाही.
यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारील काही लोकांनी ओझर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान, अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर शेजारील लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर ओझर्डे यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे तांबमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.