Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एका पाटणकरांनी 'कमळ' हाती घेतले, दुसरे बाहेर पडले
By प्रमोद सुकरे | Updated: October 20, 2025 19:01 IST2025-10-20T19:00:40+5:302025-10-20T19:01:58+5:30
भाजपचे ‘पाटण’वर लक्ष केंद्रित!

Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एका पाटणकरांनी 'कमळ' हाती घेतले, दुसरे बाहेर पडले
प्रमोद सुकरे
कराड : सध्या भाजपने पक्ष संघटना मजबूत करण्यावर खूपच भर दिला आहे. यातून त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झेंडा फडकविण्याचा इरादा स्पष्ट दिसतो. इतर पक्षातील इच्छुकांना मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. पाटण तालुक्यातही काही महिन्यापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी थोरल्या पवारांची ‘तुतारी’ वाजवण्याची सोडून देत हातात ‘कमळ’ घेतले.
अगोदरच भाजपवासी झालेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळेच गत आठवड्यात त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातात बांधले. परिणामी कमळाचे चित्र असलेल्या एका म्यानात पाटणकर नावाच्या दोन तलवारी बसत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोयना धरणामुळे पाटण तालुक्यात भूकंपाचे छोटे-मोठे धक्के वरचेवर बसत असतात. पण, सध्या येथे छोट्या मोठ्या राजकीय भूकंपाचीही मालिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या धक्क्यांचे काय परिणाम होणार? हे पाहावे लागणार आहे.
खरंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखालीच विक्रमबाबा पाटणकर हे जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्षपद झाले. पण, नंतरच्या काळात सत्यजितसिंह पाटणकर व विक्रमबाबा पाटणकर यांचे सूर जुळलेले दिसत नाहीत.
‘मशाल’ ठेवली बाजूला
पाटण तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईलाच स्थिरावलेला पाहायला मिळतो. परिणामी या सर्वांवर शिवसेनेचा अधिक प्रभाव दिसतो. पण, शिवसेनेतच उभी फूट पडल्यानंतर या शिवसैनिकांच्यातही दोन गट पडले आहेत. मंत्री देसाईंनी शिंदेंची साथ दिली तर जिल्हाप्रमुख हर्षद कदमांनी ठाकरेंसोबतच राहणे पसंत केले. पण, संक्रमणाच्या काळात ठाकरेंची शिवसेना टिकवून ठेवणे कदमांसमोर आव्हान आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा तालुकाप्रमुख सचिन आचरे यांनी देसाई गटात प्रवेश केल्याची घटनाही ताजी आहे.
भाजपचे ‘पाटण’वर लक्ष केंद्रित!
खरंतर पाटण तालुक्याचे आमदार, मंत्री शंभूराज देसाई हे भाजपच्या मित्र पक्षातील सहकारी आहेत. पण, याच मतदारसंघावर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांचे निष्ठावंत राहिलेल्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना भाजपमध्ये घेतले आहे. तर याच तालुक्यातील नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. तर अॅड. भरत पाटील यांना भारत सरकारच्या खनिज महामंडळावर संचालक म्हणून संधी दिली आहे. यावरून भाजपने या मतदारसंघावर किती लक्ष केंद्रित केले आहे हे समजून यायला हरकत नाही बरं.