गत दहा वर्षात ३३ बिबट्यांनी गमावला जीव, सातारा जिल्ह्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:19 IST2025-01-23T13:18:50+5:302025-01-23T13:19:05+5:30

कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक बळी

As many as 33 leopards lost their lives in the last ten years in Satara district | गत दहा वर्षात ३३ बिबट्यांनी गमावला जीव, सातारा जिल्ह्यातील चित्र 

गत दहा वर्षात ३३ बिबट्यांनी गमावला जीव, सातारा जिल्ह्यातील चित्र 

संजय पाटील

कऱ्हाड (जि. सातारा) : वनक्षेत्रातील गर्द झाडीचा अधिवास सोडून उसात रमलेल्या बिबट्यावर सध्या अकाली मृत्यूचे संकट आहे. त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण जास्त असून, जिल्ह्यात गत दहा वर्षांमध्ये तब्बल ३३ बिबट्यांनी जीव गमावला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडीच्या शिवारात चार दिवसांपूर्वी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे बिबट्यांच्या अकाली मृत्यूबाबत वन्यजीवप्रेमी चिंता व्यक्त करीत आहेत.

अकाली मृत्यूचे संकट

दहा वर्षांत ज्या बिबट्यांचा मृत्यू झाला ते सर्वच बिबटे पूर्ण वाढ झालेले होते. बछड्याचा अथवा वृद्धापकाळाने एकाही बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे नाही. जे मृत्यू झाले ते अकाली होते.

उपासमारीची वेळ का येते?

बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत असते. मात्र, काही बिबट्यांचा मृत्यू उपासमारीने झाला असून, प्रसंगी बेडूक खाऊन जगणाऱ्या या प्राण्यावर उपासमारीची वेळ का यावी, हा संशोधनाचा विषय आहे.

अपघात, आजाराने सर्वाधिक मृत्यू

मृत पावलेल्या बिबट्यांपैकी बहुतांश बिबट्यांना आजाराने ग्रासले होते, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. न्युमोनिया सारख्या गंभीर आजारामुळे काही बिबटे अकाली दगावलेत. तसेच वाहनांच्या धडकेत ही अनेक बिबट्यांचा बळी गेला आहे.

वनक्षेत्रानुसार बळी
सातारा : ३, महाबळेश्वर : ३, कऱ्हाड : १९, पाटण : ६, मेढा : २

कशामुळे किती बळी..?
विविध आजार (१७), वाहनांच्या धडकेत (१२), शॉक लागून (१)
शिकाऱ्यांकडून (३)

कऱ्हाडसह पाटण तालुक्यात अनेक बिबट्यांचा नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची गरज असून, शासनाने त्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. -रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक, कऱ्हाड

Web Title: As many as 33 leopards lost their lives in the last ten years in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.