Maratha Reservation: सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी, गॅझेटच्या अंमलबजावणीचे आव्हान
By दीपक देशमुख | Updated: September 4, 2025 19:51 IST2025-09-04T19:44:11+5:302025-09-04T19:51:08+5:30
संशोधनासाठी इतिहास, मोडीलिपी तज्ज्ञांच्या समितीची गरज

Maratha Reservation: सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी, गॅझेटच्या अंमलबजावणीचे आव्हान
दीपक देशमुख
सातारा : आतापर्यंत सातारा जिल्ह्यातच दीड लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्यांचा मराठ्याशी वंशावळीला निश्चित फायदा होऊ शकतो. परंतु, मराठा समाजाला ओबीसीचा लाभ होण्यासाठी सातारा गॅझेटमध्ये कुणबी व मराठे एकच असल्याचे पुरावे शोधून ते सिद्ध करण्याचे आव्हान तज्ज्ञांच्या समितीसमोर आहे.
मुंबईतील मराठा आंदोलकांना सातारा गॅझेटियर लागू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. तथापि, सातारा आणि औंध गॅझेटचा सखोल अभ्यास करून कुणबी व मराठे हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान शासनासमोर आहे. त्यामुळे शासनाला दिलेल्या मुदतीत याचा अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी लागणार आहे.
मराठा समाजासाठी कुणबी नोंदी करण्यासंदर्भात सरकारने सातारा गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना ३१ डिसेंबरपर्यंत अभिलेख व नोंदी शोधण्यासाठी मुदवाढ दिली आहे.
सातारा गॅझेट आणि औंध गॅझेटमध्ये मराठ्यांची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक स्थिती विशद करण्यात आली आहे. त्या सर्व जुन्या नोंदीचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये मराठा व कुणबी सिद्ध करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला इतिहास तज्ज्ञांची तसेच मोडी लिपी तज्ज्ञांचीही आता मदत घ्यावी लागणार आहे.
१५० सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीला तब्बल १७०० पानांच्या इंग्रजी भाषेतील गॅझेटचा किस पाडवा लागणार आहे.
पुराव्यासाठी उपयोग
१८८१ सालीच्या सातारा गॅझेटमध्ये जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती असणार आहे. यामध्ये जमीन व्यवहार, शासकीय योजना यांची माहिती असणार आहे.
राज्य शासनाच्या सूचनानुसार शोधलेल्या नोंदी व अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सातारा गॅझेटियरबाबत शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार जिल्ह्यामध्ये त्वरित कार्यवाही सुरू करण्यात येईल. - नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. काहीना काही तरी पदरात पडले आहे. सातारा गॅझेट लागू होईल तेव्हा नक्कीच आरक्षणाचा मराठाबांधवांना लाभ मिळणार आहे. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकजूट दाखवली. त्याचे हे फळ आहे, असे मला वाटते. - वैभव चव्हाण, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सातारा
मराठा समाजाचा संघर्ष सार्थकी लागल्याचा आनंद आहे. सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले आहे. सातारा व औंध गॅझेट लवकरच लागू होईल ही अपेक्षा. ही जबाबदारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतल्यामुळे त्यांची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. - बापू क्षीरसागर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सातारा