हॉटेलमधील साहित्य विकून दुबईला निघाला, कामगाराला विमानतळावर जेरबंद केला; सातारा पोलिसांची मुंबईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:15 IST2025-07-10T12:14:52+5:302025-07-10T12:15:31+5:30
नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हॉटेलमधील साहित्य विकून दुबईला निघाला, कामगाराला विमानतळावर जेरबंद केला; सातारा पोलिसांची मुंबईत कारवाई
सातारा : महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हाॅटेलमधील ९ लाखांचे साहित्य विकून तो कायमचा दुबईला स्थायिक होण्यासाठी निघाला होता. तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा आणि महाबळेश्वर पोलिसांनी संयुक्त करवाई करून त्याला मुंबई विमानतळावर अटक केली. तसेच त्याच्याकडून साहित्य विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
हाॅटेल कामगार कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, रा. नागरिक काॅलनी, वीरमाता जिजाईनगर मोरेगाव, नालासोपारा, वसई ईस्ट), भंगार व्यावसायिक करण दशरथ घाडगे (वय २५, रा. आंबवडे खुर्द, ता. सातारा) व गाैतम सुरेश जाधव (वय २५, रा. यशवंतनगर, सैदापूर ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये कांचन बॅनर्जी हा स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. पार्टनरशिपमध्ये हे हाॅटेल चालविले जात होते. सर्व मालक बाहेर राहत होते. याचा गैरफायदा घेऊन कांचन बॅनर्जी याने २५ जून २०२५ रोजी हाॅटेलमधील इलेक्ट्राॅनिक वस्तू, फर्निचर, भांडी असे तब्बल ९ लाख ९० हजारांचे साहित्य चोरून ट्रकमध्ये घालून भंगार व्यावसायिकांना विकले. त्यानंतर तो फरार झाला. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
६ जुलैला कांचन बॅनर्जी हा दुबई येथे कायमचा पळून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर, अंमलदार प्रवीण कांबळे, साबीर मुल्ला, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, नवनाथ शिंदे यांच्या पथकाला तत्काळ मुंबई येथे रवाना केले. हे पथक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होऊन त्यांनी तातडीने आरोपीला अटक केली.
विमानतळावरील चेक लाइनच्या रांगेत..
विमानतळावर कांचन बॅनर्जी हा चेक लाइनमध्ये उभा होता. तेथेच सातारा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने हाॅटेलचे साहित्य साताऱ्यातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांनाही अटक केली. त्यांच्या गोडावूनमधून चोरी केलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ज्या ट्रक व टेम्पोमधून साहित्य नेण्यात आले ती वाहनेही पोलिसांनी हस्तगत केली.
दुबईत ‘तो’ होणार होता स्थायिक..
कांचन बॅनर्जी हा अविवाहित आहे. त्याच्या कुटुंबात कोणीच नाही. तो एकटाच असल्यामुळे त्याचा दुबईला कायमचे स्थायिक होण्याचा बेत होता. तेथे गेल्यानंतर आपल्याला कोणी अटक करणार नाही, यासाठी त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.