Satara Crime: अभ्यास अन् मोबाईल वापरावरून वाद, रूम पार्टनरने केला तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:03 IST2025-10-28T19:02:40+5:302025-10-28T19:03:56+5:30
लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केला खुनाचा उलगडा

Satara Crime: अभ्यास अन् मोबाईल वापरावरून वाद, रूम पार्टनरने केला तरुणाचा खून
लोणंद : लोणंद (ता. खंडाळा) येथे माळीआळी परिसरात २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. गणेश संतोष गायकवाड (रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या लोणंद) असे मृताचे नाव आहे. लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या खूनाचा उलगडा केला. रूम पार्टनरने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले.
अधिक माहिती अशी की, गणेश गायकवाड हा लोणंद एमआयडीसी परिसरात कामाला होता. तर संशयित शिक्षणासाठी लोणंद येथे राहत होता. दोघांची मेसमध्ये ओळख झाली आणि नंतर त्यांनी एकाच खोलीत भाड्याने राहण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये अभ्यास आणि मोबाईल वापरावरून वाद झाला. त्यानंतर गणेश झोपेत असताना संशयिताने रागाच्या भरात त्याचे डोके भिंतीवर आपटले आणि कमरेच्या पट्ट्याने गळा आवळला. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट व डॉग स्क्वॉड पथकांना घटनास्थळी पाचारण करून पुरावे हस्तगत केले. प्राथमिक चौकशीत खुनाची माहिती देणारा व्यक्ती हा त्याचाच रूम पार्टनर असल्याचे समोर आले. त्याच्या वागण्यात संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याच्याच कबुली जबाबातून या खुनाचा उलगडा झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पो. उपनिरीक्षक रोहित हेगडे, डी.बी. पथकाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास केला.