Satara- घडतयं- बिघडतंय: 'बाळासाहेब' म्हणे, 'अजित पवारां'शी संबंध चांगले!, राजकीय भाष्यामुळे तर्कवितर्क सुरु
By प्रमोद सुकरे | Updated: January 2, 2025 12:30 IST2025-01-02T12:30:08+5:302025-01-02T12:30:38+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर मंगळवारी उत्पादित साखर पोत्यांचे पूजन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ...

Satara- घडतयं- बिघडतंय: 'बाळासाहेब' म्हणे, 'अजित पवारां'शी संबंध चांगले!, राजकीय भाष्यामुळे तर्कवितर्क सुरु
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर मंगळवारी उत्पादित साखर पोत्यांचे पूजन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी लगतच्या सहकारी साखर कारखान्यापेक्षा प्रति टन ४ रुपये ऊस दर जास्त देण्याचा व सभासदांना गाव पोहोच मोफत साखर देण्याचा निर्णय जाहीर करत त्यांनी जणू सभासदांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी राजकीय भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत असे सांगत जणू विरोधकांना त्यांनी सावध इशारा दिल्याचे बोलले जातेय. पण त्यांच्या या वक्तव्याने बाळासाहेब पाटील यांची पुढील भूमिका कशी राहणार ?याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या नाहीत तर नवलच!
मंगळवारी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्यात उत्पादित केलेल्या पोत्यांच्या पूजनाचा कार्यक्रम माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक मंडळ, प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमित्त जरी साखर पोती पुजनाचे असले तरी 'साखरपेरणी' पुढच्या निवडणूकीची आहे हे त्यांच्या बोलण्यातून लपून राहिले नाही.
आपल्या भावना व्यक्त करताना, सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांच्या बरोबर आपले चांगले संबंध कसे आहेत हे आवर्जून सांगत सार्वजनिक हिताची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा विचार सोडायचा नाही ही भूमिका राहिल्यानेच आपण ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बरोबर राहिलो असेही सांगायला ते विसरले नाहीत.
सध्याचा काळ आपल्याला उलटा
विधानसभा निवडणुकीचा निकाल आपण लगेच स्वीकारला आहे. सध्याचा काळ आपल्याला उलटा आहे. पण राजकारणात असे होत राहते आणि हीच परिस्थिती कायम राहील असे नसते. 'कधी नाव गाडी पे, तो कभी गाडी नाव पे' असे होत राहते. त्यामुळे काळजी करू नका असेही त्यांनी सभासद कार्यकर्त्यांना सांगितले.
आता म्हणे सभासदांना मोफत गावपोहोच साखर
सभासदांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे असे सांगत १ एप्रिल २०२५ पासून सभासदांना शेअर्सची साखर मोफत व गावपोहोच देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे बाळासाहेब पाटलांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर अगोदर ऊसाला प्रति टन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केलेली होती. मात्र त्यात ४ रुपयांची वाढ करत पहिली उचल ३२०४ रुपये प्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याचेही ते म्हणाले. पण ते ४ रुपये कसे काय वाढवून दिले याबद्दलही सभासदांच्या चर्चा सुरू आहे बरं!