99th Marathi Sahitya Sammelan: अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:31 IST2026-01-05T14:30:50+5:302026-01-05T14:31:56+5:30
साहित्य संमेलनात मराठी भाषा, शिक्षण व सांस्कृतिक प्रश्नांवर १७ ठराव मंजूर

99th Marathi Sahitya Sammelan: अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनात ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, यासह मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती व मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित एकूण १७ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रत्येक ठरावाचे उपस्थित साहित्य रसिकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त स्वागत केले.
ठरावामध्ये हिंदी वा तिसरी भाषा सक्तीच्या प्रयत्नांना ठाम विरोध करत नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करावी आणि राज्यात कोणत्याही शाळेत हिंदी वा तिसरी भाषा सक्तीची होणार नाही, याचे शासनाने लेखी अभिवचन द्यावे. राज्यातील मराठी माध्यमाच्या सुमारे १४ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने थांबवावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील सुमारे ४० हजार शाळांमध्ये शालेय ग्रंथपालांची पदे भरावीत व नवीन पदनिर्मिती करावी. तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने २०२२ मध्ये सादर केलेले ५६ पानी संपूर्ण मराठी भाषा धोरण तत्काळ जाहीर करावे, तसेच मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अपारंपरिक ‘आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ’ स्थापन करावे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांचा प्रश्न तातडीने सोडवून तो भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, मराठीसाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे. ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, असे ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आले. ठरावाचे वाचन सुनीताराजे पवार यांनी केले.
अभिजात मराठीचे लाभ केंद्राकडून मिळावेत
मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करावा, अभिजात भाषेचे सर्व लाभ केंद्राकडून मिळवून घ्यावेत, मराठी अनुवाद अकादमी स्वायत्त स्वरूपात स्थापन करावी, गोवा व गुजरातमध्ये मराठीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच सयाजीराव गायकवाड यांचे स्मारक व विमानतळ नामकरणाचे ठरावही मंजूर करण्यात आले. हे सर्व ठराव मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या हक्कांसाठी महत्त्वाचे असल्याचे मत संमेलनात व्यक्त करण्यात आले.